श्रींच्या पालखीचे पारसमध्ये उत्स्फूर्त स्वागत
By admin | Published: June 1, 2017 08:16 PM2017-06-01T20:16:17+5:302017-06-01T20:16:17+5:30
पारस : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या समर्थ गजानन महाराजांच्या पालखीचे पारसमध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पारस : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या समर्थ गजानन महाराजांच्या पालखीचे पारसमध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
३१ मे रोजी सायंकाळी ४.३० ला पालखीचे विद्युत नगर कामगार वसाहतीमध्ये आगमन झाले असता, मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांनी स्वागत व पूजन केले. याप्रसंगी सर्व अधीक्षक अभियंते, कामगार व त्यांच्या कुटुंबीयाची उपस्थिती होती. त्यानंतर वसाहतीमध्ये परिक्रमा करण्यात आली. सायंकाळी आरती व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. पालखीचा पहिला मुक्काम कामगार वसाहतीमध्ये होता. १ जूनला पहाटे ३.३० वाजता अभिषेक व त्यानंतर ५.३० वाजता पालखीचे पारस गावाकडे प्रस्थान करण्यात आले. यावेळी भगतवाडी, टी पॉइन्ट, शिक्षक कॉलनी, रे. स्टेशन, गांधी चौक, शिवाजी चौक, पोळा चौक ते महात्मा फुले चौकात संपूर्ण फुलांचे आच्छादन करण्यात आले. रांगोळ्यांनी रस्ते सजविले तर मराठमोळा वेश परिधान केलेल्या विद्यार्थिनींनी पालखीमध्ये उपस्थित सर्वांवर फुलांचा वर्षाव केला. स्वागताचा हा विहंगम सोहळा पाहण्यास व श्रींच्या दर्शनास पारस व परिसरातील हजारो भाविकांनी आपली उपस्थिती दर्शविली. आमदार बळीराम सिरस्कार यांनी याप्रसंगी पालखीचे पूजन केले. पहाटे हजेरी लावलेल्या पावसाने वातावरण आल्हाददायक झाले. समर्थांच्या पालखीचे त्यानंतर निमकर्दा, गायगावकडे प्रस्थान झाले. संपूर्ण पारस गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. पोलीस बंदोबस्त चोख होता.