क्रीडा स्पर्धा : अकोला तालुका हॅट्ट्रिकसह चॅम्पियन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:28 PM2020-01-22T12:28:10+5:302020-01-22T12:28:32+5:30
अकोला तालुक्याला सलग तीन वर्ष सामूहिक विजेतेपद तर मिळून दिलेच त्याचबरोबर हॅट्ट्रिकसुद्धा साधली.
अकोला : अकोला जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या खेळ व क्रीडा स्पर्धेत अकोला तालुक्याच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागाच्या खेळाडूंनी आपल्या दमदार खेळाचे प्रदर्शन करून अकोला तालुक्याला सलग तीन वर्ष सामूहिक विजेतेपद तर मिळून दिलेच त्याचबरोबर हॅट्ट्रिकसुद्धा साधली. विशेष म्हणजे सलग ३ वर्ष चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळून देण्यामागे सर्वच अधिकारी व खेळाडू यांचा मोलाचा वाटा उचलला.
वसंत देसाई क्रीडांगण येथे १७ ते १९ जानेवारीदरम्यान आयोजित या क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील सात तालुके तथा मुख्यालयाचा एक संघ असे एकूण आठ संघ सहभागी झाले होते. सर्व तालुक्यांना लॉट्स पाडून आपसात खेळविण्यात आले. बॅडमिंटन खुला गट व बॅडमिंटन या प्रकारात अकोल्याचा वरचष्मा राहिला. अकोल्याचे राजीव गरकल यांनी ३ प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच वंदना मांगटे यांनी उल्लेखनीय कामगिरी करून ५ पदके मिळवून दिली. अकोल्याचा संघ उभा करण्यामागे गटविकास अधिकारी राहुल शेळके, सहायक गटविकास अधिकारी मदनसिंग बहुरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर जगदीश बनसोडे, गटशिक्षणाधिकारी श्याम राऊत, केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर मांडेकर, राजीव गरकल, तालुका समन्वयक अमर गजभिये, रजनीश ठाकरे, नरेश तायडे, श्याम कुलट, नितीन बंडावर यांचे मोलाचे योगदान होते. तद्वतच सर्व सहभागी व विजयी खेळाडूंनी खूप चांगला खेळ करून तालुक्याला विजयश्री प्राप्त करून दिली.