आदिवासी विकास विभागाच्या क्रीडा स्पर्धेला उत्साहात सुरुवात
By रवी दामोदर | Published: December 8, 2023 06:02 PM2023-12-08T18:02:53+5:302023-12-08T18:03:18+5:30
विद्यार्थ्यांमध्ये खेळांबाबत गोडी वाढविण्यासाठी हा उपक्रम लाभदायी ठरेल, असे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
अकोला : आदिवासी विकास विभागातर्फे शासकीय व अनुदानित आश्रम शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी विभागीय क्रीडा स्पर्धेला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते दि.८ डिसेंबर रोजी वसंत देसाई स्टेडियम येथे सुरुवात झाली. याप्रसंगी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, आदिवासी विकास अपर आयुक्त सुरेश वानखडे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे, सहायक आयुक्त प्रीती बोंदरे, आत्माराम धाबे, लोखंडे, अविनाश मेतकर, जागृती उईके, अजाबराव उईके, सुरेश सोळंके, पार्वतीताई ठाकरे, उमेश पवार, शिवसिंग सोळंके, दिशानाथ शेवाळे, योगेश कुरसुंगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
खेळामुळे शारीरिक व मानसिक कौशल्यांचा विकास होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळांबाबत गोडी वाढविण्यासाठी हा उपक्रम लाभदायी ठरेल, असे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. कार्यक्रमात वानखडे, व्यवहारे यांनी मनोगत व्यक्त केले. क्रीडाप्रेमी व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
३५० खेळाडूंचा समावेश, रविवारी समारोप
धारणी, पुसद, कळमनुरी, पांढरकवडा, किनवट येथील प्रकल्प कार्यालयांच्या शाळांच्या माध्यमातून ३५० विद्यार्थी खेळाडू महोत्सवात सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी कवायत व खेळांचे अवलोकन करून खेळाडूंशी संवाद साधला व त्यांचे मनोबल वाढविले. स्पर्धेत विविध शाळांचे विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारांत सहभागी होणार आहेत. स्पर्धेचा दि. १० डिसेंबर रोजी दु. २ वा. समारोप व बक्षीस वितरण सोहळा होणार आहे.