वस्तूंचा काळाबाजार रोखण्यासाठी पथके गठित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 11:00 AM2020-03-27T11:00:10+5:302020-03-27T11:00:18+5:30
उपलब्ध साठा आणि वस्तूंचे घाऊक (होलसेल) व किरकोळ विक्रीचे दर यासंदर्भात पथकांकडून तपासणी करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ आणि काळाबाजार रोखण्यासाठी अकोला शहरासह जिल्ह्यातील तालुका स्तरावर अधिकाऱ्यांची पथके गठित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी दिला. जीवनावश्यक वस्तूंचा उपलब्ध साठा आणि वस्तूंचे घाऊक (होलसेल) व किरकोळ विक्रीचे दर यासंदर्भात पथकांकडून तपासणी करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यात २४ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ करण्यात आली असून, नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची जादा दराने विक्री करण्यात येत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत. त्यानुषंगाने जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ व काळाबाजार रोखण्यासाठी अकोला शहरासह जिल्ह्यातील तालुका स्तरावर अधिकाऱ्यांची पथके गठित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला. जीवनावश्यक वस्तूंचा साठा आणि वस्तू विक्रीचे होलसेल व किरकोळ दर यासंदर्भात संबंधित पथकांकडून तपासणी करण्यात येणार आहे.
अशी आहेत पथके!
जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ रोखण्यासाठी गठित करण्यात आलेल्या पथकांमध्ये अकोला शहरासाठी अकोल्याचे तहसीलदार व अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्या नेतृत्वात दोन पथके आणि जिल्ह्यातील सातही तालुक्यांसाठी संबंधित तहसीलदारांच्या नेतृत्वात प्रत्येकी एक पथक गठित करण्यात आले आहे.