SSC Result : अकोल्याच्या मुलीच हुश्शार..जिल्ह्याचा निकाल ९५.५२ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 01:20 PM2020-07-29T13:20:28+5:302020-07-29T13:44:13+5:30
कोरोना संकटाच्या पृष्ठभूमीवर जाहीर झालेल्या या निकालात अकोला जिल्ह्याचा निकाल ९५.५२ .टक्के लागला आहे.
अकोला : राज्य शिक्षण मंडळाद्वारे अमरावती विभागाअंतर्गत मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक इयत्ता दहावीच्या परीक्षेचा आॅनलाइन निकाल बुधवार, २९ जुलै रोजी आॅनलाईन जाहीर करण्यात आला असून, दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलींनीच बाजी मारली आहे.
कोरोना संकटाच्या पृष्ठभूमीवर जाहीर झालेल्या या निकालात अकोला जिल्ह्याचा निकाल ९५.५२ .टक्के लागला आहे. बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातदेखील मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९७.२३ टक्के, तर मुलांचा निकाल ९३.९९ टक्के लागला आहे. अमरावती विभागातील निकालात जिल्हा तिसºया क्रमांकावर आहे. मार्चमध्ये झालेल्या दहावी परीक्षेसाठी जिल्ह्यात ११९ परीक्षा केंद्रं होती. जिल्ह्यात एकूण २७०९१ नोंदणीकृत परीक्षार्थी होते. त्यापैकी २६९३३ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस बसले होते. त्यापैकी ८९३८ विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीत , ९०९९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६२४५ द्वितीय श्रेणीत, तर १५५४ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण २५७२७ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी झाले आहेत. जिल्ह्यात बारावीच्या निकालातही मुलीच अव्वल ठरल्या होत्या. दहावीच्या निकालाने विद्यार्थ्यांच्या स्वप्नांच्या पंखांना नवे बळ मिळाले आहे.
पातूर तालुका अव्वल
जिल्ह्यात पातूर तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९७.१७ टक्के लागला आहे. त्यानंतर मुर्तीजापूर - ९६.८५ टक्के, बार्शीटाकळी - ९६.१३ टक्के, अकोला ९५.६८ टक्के, अकोट - ९४.८६ टक्के, बाळापूर - ९४.६८ टक्के व तेल्हारा ९३.६५ टक्के असा क्रम आहे.