अत्यावश्यक सेवेसाठी आजपासून एसटी बस सेवा पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 10:15 AM2021-05-24T10:15:30+5:302021-05-24T10:15:41+5:30
ST bus service from Akola : सोमवार, २४ मेपासून केवळ अत्यावश्यक सेवेसाठी बससेवा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे.
अकोला : कोरोनाच्या उद्रेकामुळे मागील तेरा दिवसांपासून एसटी बससेवा बंद ठेवण्यात आली होती. सोमवार, २४ मेपासून केवळ अत्यावश्यक सेवेसाठी बससेवा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असल्याने राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत निर्बंध लावले आहेत. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने व प्रवासीही मिळत नसल्याने एसटी महामंडळाने केवळ अत्यावश्यक सेवेसाठी बससेवा सुरू ठेवली होती. दररोज १०-११ बसेसच्या १५-२५ फेऱ्या होत होत्या. परंतु कोरोना रुग्णसंख्या कमी होत नसल्याने जिल्हा प्रशासनाने ९ मे रात्री १२ पासून कडक निर्बंध लावले होते. यामध्ये सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे एसटी महामंडळाची बससेवाही बंद ठेवण्यात आली होती. गेल्या १६ मेपासून या निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील नागरिकांची गैरसोय होऊ नये, याकरिता एसटी बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ही बससेवा केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहणार आहे.
येथे सुटणार बस
अकोला शहरातील क्रमांक २ बसस्थानकातून अकोट, अमरावती, खामगाव, शेगाव, बुलडाणा, यवतमाळ या मार्गांवर बससेवा सुरू करण्यात येणार आहे.