लालपरीला पसंती, पाच दिवसात ४६०० भाविकांनी गाठली पंढरी
By Atul.jaiswal | Published: June 26, 2023 05:24 PM2023-06-26T17:24:43+5:302023-06-26T17:25:00+5:30
२२ जूनपासून सुरु झालेल्या विशेष गाड्यांना अकोला व वाशिम जिल्ह्यातील भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अकोला : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) अकोला विभागाने यंदा पंढरपूर यात्रेसाठी २२० गाड्यांचे नियोजन केले असून, २२ जूनपासून सुरु झालेल्या विशेष गाड्यांना अकोला व वाशिम जिल्ह्यातील भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गत पाच दिवसांत विभागातून सोडण्यात आलेल्या ९५ गाड्यांमधून जवळपास ४६२० भाविकांनी पंढरपूर गाठल्याची माहिती समोर आली आहे.
अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या पंढरीच्या विठूरायाच्या भेटीला जाणाऱ्या भाविकांची अकोला व वाशिम जिल्ह्यात मोठी संख्या आहे. महामंडळाकडून दरवर्षी पंढरपूरसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात येते. येत्या २९ जूनला आषाढी एकादशी आहे. या उत्सवासाठी हजारो भक्तांनी पंढरीच्या वारीची तयारी केली असून, त्यांना यात्रा विशेष गाड्यांचा आधार मिळत आहे. अकोला व वाशिम जिल्ह्यातील नऊ आगारांमधून २२० गाड्या सोडण्यात येत आहेत. यावर्षी भाविकांचा ओढा बसने प्रवास करण्याकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोफत व महिलांना ५० टक्के सवलत असल्यामुळे पंढरपूर विशेष गाड्या हाऊसफुल्ल धावत असल्याचे चित्र आहे.