अकोल्यात उपोषणावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्याची प्रकृती खालावली, सर्वोपचार रुग्णालयात दाखल
By Atul.jaiswal | Published: September 2, 2023 06:07 PM2023-09-02T18:07:31+5:302023-09-02T18:07:53+5:30
विभागीय कार्यालयातून प्रशासकीय कारणावरून केलेली आपली बदली नियमबाह्य असल्याचा आरोप तेलगोटे यांचा आहे.
अकोला: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी)च्या अकोला विभागीय कार्यालयातून विभागीय कार्यशाळेत झालेली बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी २२ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणावर असलेले वरिष्ठ लिपिक प्रवीण तेलगोटे यांची प्रकृती शनिवार, २ सप्टेंबर रोजी पुन्हा खालावल्यामुळे त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापूर्वी, ३१ ऑगस्ट रोजीही त्यांना उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले होते.
विभागीय कार्यालयातून प्रशासकीय कारणावरून केलेली आपली बदली नियमबाह्य असल्याचा आरोप तेलगोटे यांचा आहे. बदली रद्द करण्याची मागणी त्यांनी विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. परंतु, मागणी मान्य न झाल्यामुळे तेलगोटे यांनी २२ ऑगस्टपासून विभागीय कार्यालयाच्या परिसरात बेमुदत उपोषणास प्रारंभ केला. विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट यांनी तेलगोटे यांची भेट घेऊन उपोषण सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, बदली रद्द झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याच्या भूमिकेवर तेलगोटे ठाम राहिले. उपोषणाच्या दहाव्या दिवशी तेलगोटे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. उपचारानंतर ते पुन्हा उपोषणस्थळी परत आले. बाराव्या दिवशी पुन्हा त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेलगोटे यांना दाखल करून घेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.