एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर ना पगार मिळतो, ना वैद्यकीय बिले मिळतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:22 AM2021-09-14T04:22:51+5:302021-09-14T04:22:51+5:30

अकोला : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) कर्मचारी अखंडपणे आपली सेवा बजावत असले, तरी या ...

ST employees do not get salary on time, nor do they get medical bills | एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर ना पगार मिळतो, ना वैद्यकीय बिले मिळतात

एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर ना पगार मिळतो, ना वैद्यकीय बिले मिळतात

Next

अकोला : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) कर्मचारी अखंडपणे आपली सेवा बजावत असले, तरी या कामाचा मोबदला म्हणून महिन्याकाठी निश्चित असलेला पगार मात्र त्यांना कधीही वेळेवर मिळत नाही. दोन महिन्यांतून एकदा पगार मिळत असल्यामुळे घरखर्च कसा भागवावा, असा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांसमोर नेहमीच आ वासून उभा असतो. एवढेच नव्हे, तर सेवा बजावत असताना आजारपण किंवा अपघातावर झालेला वैद्यकीय खर्चाची बिलेही लवकर मिळत नाहीत. कर्मचाऱ्यांनी दाखल केलेली वैद्यकीय बिले सहा ते आठ महिने मंजूरच होत नसल्याची माहिती आहे. एकीकडे पगार वेळेवर होत नसताना, उपचारांवर झालेला खर्च कोठून आणावा, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडतो. एसटीच्या अकोला विभागात अकोला व वाशिम या जिल्ह्यांचा समावेश असून, एकूण २५०० अधिकारी/कर्मचारी कार्यरत आहेत.

जिल्ह्यात एकूण आगार - ५

वाहक - ८२३

चालक - ९४३

अधिकारी - २४

पगार दोन महिन्यांतून एकदा

एसटीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कधीच वेळेवर पगार मिळत नाही. वेतन प्रधान अधिनियम १९३६ च्या तरतुदीनुसार किमान १० तारखेच्या आत वेतन अदा करण्याची तरतूद असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही. दोन ते तीन महिने पगार अदा केले जात नाही. जुलै महिन्याचा पगार सप्टेंबर महिन्यात देण्यात आला.

वैद्यकीय बिले सहा महिने मिळेनात

कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर न करणाऱ्या एसटी महामंडळात कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले काढण्यातही कमालीची दिरंगाई केले जाते. सेवारत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आजारपणात केलेला खर्च महामंडळाकडून दिला जातो. यासाठी प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे. तथापी, प्रस्ताव सादर केल्यानंतरही बिल निघण्यासाठी महिनोगणती वाट पहावी लागते. सहा ते आठ महिने बिल निघतच नाही. कधी कधी वर्ष उलटून गेल्यानंतरही बिल मिळत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणने आहे.

उपचारावर झालेला खर्च आणावा कोठून?

आम्ही म्हणायलाच शासकीय सेवेत आहोत. इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आमचे पगार कधीच वेळेवर होत नाहीत. दोन महिन्यांतून एकदा पगार घ्यावा लागतो, अशी स्थिती आहे. वैद्यकीय बिलेही लवकर काढली जात नाहीत. अनेकदा तर ही बिले मिळतही नाहीत.

- एक कर्मचारी

वैद्यकीय बिलासाठी प्रस्ताव सादर केल्यानंतरही तो मंजूर होईलच याची शाश्वती नसते. यामध्येही अनेक अटी, शर्ती आहेत. आजारपणावर केलेला खर्च महामंडळाकडून मिळावा अशी अपेक्षा असते, परंतु अनेकदा उपेक्षाच पदरी पडते.

- एक कर्मचारी

Web Title: ST employees do not get salary on time, nor do they get medical bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.