बुलडाण्यात खासगी संस्थेला दिलेले एसटी पार्सलचे काम बंद; एसटीने सुरु केली सेवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 02:52 PM2017-12-26T14:52:56+5:302017-12-26T15:14:34+5:30
बुलडाणा : एसटी महामंडळातंर्गत कुरियर (पार्सल) सेवा पुरविणाऱ्या संस्थेचे कंत्राट पाच वर्षानंतर रद्द करण्यात आले असून व्यावसायिक तथा नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सध्या ही सेवा आता स्वत: एसटी महामंडळच देत आहे.
बुलडाणा : एसटी महामंडळातंर्गत कुरियर (पार्सल) सेवा पुरविणाऱ्या संस्थेचे कंत्राट पाच वर्षानंतर रद्द करण्यात आले असून व्यावसायिक तथा नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सध्या ही सेवा आता स्वत: एसटी महामंडळच देत आहे.
जिल्ह्यात दहा ठिकाणी कंत्राटीपद्धतीने यापूर्वी ही सेवा सुरू होती. मात्र ती बंद करण्यात आल्याने आता एसटी महामंडळाचे काम वाढले असून यंत्रणा सुरळीत होईस्तोवर व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांची काही काळ अडचण होणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाची १९४८ मध्ये स्थापना झाली तेव्हापासून ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ एसटी धावत आहे. त्याचबरोबर एसटी महामंडळाकडून अविरत पार्सल सेवाही देण्यात येत आहे. पार्सल सेवेच्या अनुषंगाने पूर्वी एसटीच्या आस्थापनेवर हमाल कर्मचारी कार्यरत होते. सुरूवातीपासूनच भरवशाची पार्सल सेवा म्हणून एसटीच्या पार्सल सेवेकडे बघीतले जात होते. मात्र, एसटी महामंडळाने पार्सल सेवेचे खासगीकरण करून महामंडळाच्या स्थापनेपासून कार्यरत असलेली पार्सल सेवा २०१२ मध्ये एका संस्थेस चालविण्यास दिली होती. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात १० ठिकाणी खाजगी संस्थाकडे पार्सल सेवा देण्यात आली होती. परंतू गत चार दिवसांपूर्वी खासगी एजन्सीने कराराचा भंग केल्याच्या कारणावरून एसटी महामंडळाने पार्सल सेवेचा करार रद्द केला. एसटी महामंडळाच्या या निर्णयाने राज्यातील अनेक ठिकाणची सेवा बंद झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील दहा ठिकाणचे खासगी संस्थेचे पार्सल बंद झाले आहेत. त्यामुळे खाजगी संस्थेकडे असलेली पार्सल सेवा आता एसटी महामंडळाकडून चालविल्या जात आहे. पार्सलची सेवा एसटी महामंडळाच्या ताब्यात आल्याने एसटी कर्मचाºयांच्या कामात भर पडल्याचे दिसून येत आहे.
कुरिअर वाल्यांची चांदी
आतापर्यंत खाजगी एजन्सीमार्फत होणारी पार्सल सेवा अचानक बंद पडल्याने व्यावसायिक खासगी कुरिअर (पार्सल) सेवेची मदत घेत आहेत. बंद पडलेली ही सेवा सध्या एसटी महामंडळाकडूनच पुरविल्या जात असल्याची माहिती अनेक व्यापाºयांना नाही. त्यामुळे नवीन पार्सल पाठविणारे खासगी कुरिअरकडे जात असून, यात कुरिअर वाल्यांची चांदी होत आहे.
खाजगी संस्थेची पार्सल सेवा एसटी महामंडळाने काढून घेतली आहे. त्यामुळे सध्या पार्सल पाठविणाºयांना अडचणी जावू नये, यासाठी पार्सलची सेवा एसटीकडून चालविल्या जात आहे. यावर लवकरच वरिष्ठस्तरावर निर्णय होईल.
- ए. यू. कच्छवे, विभागीय वाहतूक अधिकारी, बुलडाणा.