एसटीचा संप मिटला ; सगळ्यांच्या हाताला काम, सगळ्यांनाच दाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2022 12:18 PM2022-05-10T12:18:32+5:302022-05-10T12:20:35+5:30

ST strike ends; Work in everyone's hands : पाचही आगारांमध्ये एखाद-दुसरा अपवाद वगळता चालक व वाहकांना काम मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

ST strike ends; Work in everyone's hands, price for everyone | एसटीचा संप मिटला ; सगळ्यांच्या हाताला काम, सगळ्यांनाच दाम

एसटीचा संप मिटला ; सगळ्यांच्या हाताला काम, सगळ्यांनाच दाम

Next
ठळक मुद्देप्रशासनाकडून केले जातेय नियोजन गाड्यांच्या फेऱ्या वाढविल्या

अकोला : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानंतर लालपरीची प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आली आहे. सर्वच कर्मचारी रुजू झाल्यानंतर उपलब्ध बसगाड्या व फेऱ्यांची संख्या पाहता चालक व वाहकांना काम मिळेल की नाही अशी शंका उपस्थित केली जात होती; परंतु जिल्ह्यातील पाचही आगारांमध्ये एखाद-दुसरा अपवाद वगळता चालक व वाहकांना काम मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

एसटीच्याअकोला विभागातील अकोला जिल्ह्यात अकोला क्र. १, अकोला क्र. २, अकोट, मूर्तिजापूर व तेल्हारा असे पाच आगार आहेत. या आगारांमध्ये संपानंतर सर्वच कर्मचारी कामावर परतले आहेत. एसटीमध्ये काम नाही तर दाम नाही अशी पद्धत आहे. अकोला विभागातील ७० बस भंगार झाल्याने एकूण बसगाड्यांची संख्या कमी झाली आहे. परिणामी पूर्वीच्या तुलनेत फेऱ्यांची संख्या कमी झाली आहे. अशा परिस्थितीत चालक व वाहकांना काम देण्याचे नियोजन करताना आगार प्रमुखांची कसरत होत आहे; परंतु अपवाद वगळता सर्वांना कामगिरी दिली जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

 

 

कोणत्या आगारात किती बस, किती कर्मचारी?

आगार -             रोजच्या फेऱ्या -             चालक/वाहक

अकोला क्र. १ - १५२ -             १६२

अकोला क्र. २ - १०२ -             १९८

अकोट - १५५ -             १८९

मूर्तिजापूर - ९३ -             ११५

तेल्हारा - १४० -             १४३

 

सगळ्या कर्मचाऱ्यांना मिळतेय रोज काम

अकोला जिल्ह्यातील पाच आगारांमध्ये जवळपास ८०७ चालक व वाहक आहेत. संपानंतर सर्वच वाहक व चालक रुजू झाले आहेत. गत दोन वर्षांत आगारांमधील बसगाड्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे फेऱ्यांचे नियोजन करून सर्वच कर्मचाऱ्यांना काम देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे एसटीचे अधिकारी सांगतात

 

 

संपानंतर सर्वच कर्मचारी कामावर परतले असून, सर्वांना कामगिरी मिळणे गरजेचे आहे. बहुतांश चालक व वाहकांना कामगिरी मिळत आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला एखाद्या दिवशी कामगिरी मिळाली नाही तर दुसऱ्या दिवशी त्याची भरपाई केली जाते.

- सचिन गव्हाळे, संघटना पदाधिकारी

 

आमच्या आगारात सर्वच कर्मचाऱ्यांना कामगिरी मिळत आहे. कामगिरीबाबत कोणत्याही तक्रारी नाहीत. संप मिटल्यानंतर फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वांनाच काम मिळत आहे.

- दिनेश गावंडे, एसटी कर्मचारी

 

 

उपलब्ध बसगाड्यांनुसार फेऱ्यांचे नियोजन करून प्रत्येक कर्मचाऱ्यांना कामगिरी मिळेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आता उन्हाळी सुट्यांमध्ये फेऱ्या वाढविण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामगिरीबाबत काही समस्या नाही.

- श्रीकांत गभने, प्रभारी वाहतुक नियंत्रक, अकोला

Web Title: ST strike ends; Work in everyone's hands, price for everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.