एसटीचा प्रवास सुरक्षित; मग ट्रॅव्हल्सला पसंती का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:13 AM2021-07-24T04:13:09+5:302021-07-24T04:13:09+5:30
कोरोच्या संकट काळातही एसटी महामंडळाच्या बसेसने प्रवाशांना मोठा आधार दिला. इतर राज्यांपर्यंतचा पल्ला गाठत मजुरांना त्यांच्या गावापर्यंत सोडले होते. ...
कोरोच्या संकट काळातही एसटी महामंडळाच्या बसेसने प्रवाशांना मोठा आधार दिला. इतर राज्यांपर्यंतचा पल्ला गाठत मजुरांना त्यांच्या गावापर्यंत सोडले होते. जिल्हाअंतर्गत असो की इतर जिल्ह्यात प्रवाशांकडून एसटी बसला प्राधान्य देण्यात येते. एसटीचा प्रवास हा सुखकर प्रवास मानला जातो; परंतु गत काही वर्षांपासून खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास वाढला आहे. पुणे, मुंबई, नागपूर यासारख्या मोठ्या शहरात जाण्यासाठी ट्रॅव्हल्समधून प्रवास होत आहे.
एसटीला स्पीड लॉक, ट्रॅव्हल्स सुसाट
एसटी महामंडळाच्या बसेसचा स्पीड लॉक केलेला असतो. ग्रामीण भागात धावणाऱ्या बसेसचा स्पीड ६५ किलोमीटर प्रति तास, लांब व मध्यम पल्ल्याच्या ७० वर आणि शिवशाही ७५ ते ८० पर्यंत स्पीड लॉक करण्यात येतो. त्या तुलनेत ट्रॅव्हल्सचा स्पीड थोडा अधिक असतो. ट्रॅव्हल्सचा स्पीड ८० वर लॉक केलेला असतो. त्यामुळे एसटी बसच्या तुलनेत ट्रॅव्हल्स सुसाट वेगाने धावताना दिसतात.
आराम महत्त्वाचा की सुरक्षित प्रवास
ट्रॅव्हल्सने आरामदायी प्रवास होत असल्यामुळे मी खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला पसंती देतो. याशिवाय अपघात झाल्यास एसटीकडून भरपाई मिळते ; परंतु खासगी ट्रॅव्हल्सकडून मोबदला मिळतो की नाही माहिती नाही.
- प्रदीप मते, प्रवासी
सुरुवातीपासून ट्रॅव्हल्सने प्रवास करतो ; परंतु आजपर्यंत कधीच अपघात झाल्याचा अनुभव आला नाही. ट्रॅव्हल्सनेही सुरक्षित प्रवास होत असल्यामुळे ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला प्राधान्य देतो. जवळपास जाण्यासाठी एसटीने प्रवास करतो.
- विजय गवई, प्रवासी
...म्हणून अपघाताची शक्यता कमीच!
ट्रॅव्हल्सचा प्रवास आरामदायी असतो. अपघात झाल्यास इन्शुरन्सचे पैसे मिळतात. एखादी महिला एकट्याने प्रवास करीत असेल तर तिच्या बाजूला पुरुष प्रवाशाला सीट देण्यात येत नाही. तसेच १० ते १२ वर्षांला ट्रॅव्हल्स गाडी बदलण्यात येत असल्यामुळे अपघाताची शक्यता राहत नसल्याचे ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने सांगितले.
विभागातील एसटी बसेस
३८३
शहरातून निघणाऱ्या ट्रॅव्हल्स
४०