ST Workers: सदावर्तेंची क्रेझ उतरली, ST कामगारांनीच जाळल्या संघटनेच्या पावत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 07:19 PM2023-01-30T19:19:03+5:302023-01-30T19:21:42+5:30
जानेवारी महिना उजाडला तरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नव्हता. त्यावरुन, विपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गुणरत्न सदावर्तेना टोला लगावला होता.
अकोला - राज्यातील एसटी कामगारांच्या पगारावरुन काही दिवसांपूर्वी विरोधक आक्रमक झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर, राज्य सरकारने एसटी कामगारांच्या पगारासाठी ३०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मात्र, महाविकास आघाडी सरकार काळात एसटी कर्मचाऱ्यांनी मोठा संप केला होता. त्यावेळी, कामगारांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते हे डंके की चोट पे म्हणत आंदोलनात मोठ्या हिरिरीने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे कामगारांचे नेते म्हणूनही ते वागत होते. एसटी कामगार संघटनेचीही त्यांनी स्थापना केली होती. मात्र, आता कामगारांनीच गुणरत्न सदावर्तेंच्या संघटनेच्या पावत्या जाळल्या आहेत.
जानेवारी महिना उजाडला तरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नव्हता. त्यावरुन, विपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गुणरत्न सदावर्तेना टोला लगावला होता. डंके की चोटवाला कुठं गेला, कुठं गेला डंका आणि कुठं गेली चोट, असा सवाल अजित पवार यांनी विचारला होता. तर, आता गुणरत्न सदावर्ते यांच्या कामगारांनीच त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आहे. अकोल्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी गुणवंत सदावर्ते यांच्या एस.टी.कष्टकरी जनसंघटनेच्या पावत्या जाळून गुणवंत सदावर्ते यांचा निषेध व्यक्त केला.
एकेकाळी सर्व इष्ट कर्मचाऱ्यांनी गुणवंत सदावर्ते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सहकार्य केले. पण, आज तोच एसटी कर्मचारी गुणवंत सदावर्तेंविरोधात गेला. कारण, आंदोलनावेळी केलेलं एकही आश्वासन आजपर्यंत पुरे झालेलं नाही. त्यामुळे नाराज झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आगार क्रमांक दोनच्या गेट समोर संघटनेच्या पावत्या जाळून सदावर्ते यांच्या बदललेल्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला आहे.