निकषांना ठेंगा; मोठी उमरी रस्त्याचे काम दर्जाहीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 02:33 PM2019-02-08T14:33:11+5:302019-02-08T14:33:32+5:30
अकोला: प्रभाग क्रमांक ४ अंतर्गत येणाऱ्या मोठी उमरी भागातील रेल्वेगेट ते गुडधीपर्यंत निर्माणाधीन डांबरी रस्त्याचे काम अत्यंत दर्जाहीन होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कंत्राटदाराने निकष-नियम धाब्यावर बसवत रस्त्याचे काम सुरू केले आहे.
अकोला: प्रभाग क्रमांक ४ अंतर्गत येणाऱ्या मोठी उमरी भागातील रेल्वेगेट ते गुडधीपर्यंत निर्माणाधीन डांबरी रस्त्याचे काम अत्यंत दर्जाहीन होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कंत्राटदाराने निकष-नियम धाब्यावर बसवत रस्त्याचे काम सुरू केले आहे. या प्रकाराकडे महापालिका प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन सुधारणा न केल्यास आंदोलनाचा मार्ग मोकळा असल्याचा इशारा निवेदनाद्वारे शिवसेनेने दिला आहे.
महापालिका क्षेत्रात सामील झालेल्या मोठी उमरी ते गुडधीपर्यंत चार पदरी डांबरी रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत के ले जात आहे. यासाठी २ कोटी ३४ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत. संबंधित विभागाने २१ नोव्हेंबर २०१६ रोजी वर्क आॅर्डर जारी केली होती. यामध्ये सहा महिन्यांत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश होते. सी.आर. कन्स्ट्रक्शन नामक कंत्राटदाराकडून डांबरी रस्त्याचे काम केले जात असले तरी सदर कंत्राटदाराने सर्व निकष-नियम धाब्यावर बसवल्याचे शिवसेनेच्या तक्रारीत नमूद आहे. फेब्रुवारी महिना उजाडला असला तरी अद्यापही रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. येत्या १९ फेबु्रवारी रोजी या भागात शिवजयंतीचा मोठा उत्साह साजरा केला जातो. रस्त्याची संथगती पाहता मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर धिवरे यांनी रस्ता दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी शिवसेना शहर प्रमुख (पूर्व) अतुल पवनीकर यांनी केली. याप्रसंगी नगर सेवक मंगेश काळे, उपशहर प्रमुख केदार खरे, अभिषेक खरसाडे, जि.प. सर्कल प्रमुख दिनेश सरोदे,पप्पू चौधरी, गजानन बोराळे, अविनाश मोरे,अनिल परचुरे, विशाल कपले, निशांत सरोदे, नंदकिशोर ढाकरे, प्रकाश वानखडे, भूषण हागे, विलास मुंडोकार, प्रमोद धर्माळे, मुन्ना भाकरे, हर्षल ताडम, मयूर मोरे, वैभव खेडकर, मनोज तायडे, जयेश पांढरे, अक्षय हरणे, नागेश, राहुल गवळी, उमेश जोशी, अमोल शर्मा, शुभम वानखडे, अक्षय गावंडे, गजानन विटनकर, गणेश टाले, अक्षय बघेवार, राहुल ताथोड, आकाश आसोलकर, महादेव कपले, आशुतोष बोबळे, कुणाल नावकार, अभिजित गोंडचवर, अजय पीठणकर, नितीन खेडकर, योगेश विश्वकर्मा, दिनेश कावळे, अजय ताथोड यासंह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
दर्जाहीन कामाकडे दुर्लक्ष का?
कंत्राटदाराने १६.६९ टक्के कमी दराने सादर केलेली निविदा पीडब्ल्यूडीने मंजूर केली असून, रस्त्याचे काम दर्जाहीन होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. रस्त्यासंदर्भात माहिती फलक लावण्यात आला नसून, रस्त्याची रुंदी १५.७० मीटर असताना प्रत्यक्षात १५.३० मीटर अंतराचा रस्ता तयार केला जात असताना प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष का, असा सवाल सेनेने उपस्थित केला आहे.