सवलतीच्या दरातील धन्य वाटपाचा पेच कायमच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 11:04 AM2020-09-27T11:04:37+5:302020-09-27T11:04:51+5:30
राज्यातील ३ कोटी ८ लाख ४४ हजार केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थीकडून प्रतीक्षा केली जात आहे.
- संतोष येलकर
अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व इतर योजनेत अन्नधान्याचा लाभ मिळत नसलेल्या राज्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक लाभार्थींना सवलतीच्या दरात धान्य वितरित करण्याचा निर्णय अडीच महिन्यांपूर्वी शासनाने घेतला; मात्र जिल्हास्तरावर अद्यापही धान्यसाठा उपलब्ध झाला नसल्याने, सवलतीच्या दरातील धान्य वाटपाचा पेच कायमच आहे. त्यामुळे सवलतीच्या दरातील धान्याचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत राज्यातील ३ कोटी ८ लाख ४४ हजार केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थीकडून प्रतीक्षा केली जात आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकट काळात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व इतर कोणत्याही योजनेत अन्नधान्याचा लाभ मिळत नसलेल्या राज्यातील केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींना गत मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीत ८ रुपये प्रतिकिलो गहू व १२ प्रतिकिलो तांदूळ याप्रमाणे सवलतीच्या दरात धान्याचे वितरण करण्यात आले होते. याच धर्तीवर राज्यातील केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींना जुलै व आॅगस्ट या दोन महिन्यांच्या कालावधीत सवलतीच्या दरात धान्य वितरित करण्याचा निर्णय शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत १० जुलै रोजी घेण्यात आला तसेच केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींना सवलतीच्या दरात धान्य वितरित करण्यासाठी धान्याचे नियतनही मंजूर करण्यात आले. अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र मंजूर करण्यात आलेला धान्यसाठा अद्यापही राज्यातील जिल्हास्तरावर उपलब्ध झाला नाही. त्यामुळे राज्यातील ३ कोटी ८ लाख ४४ हजार केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींना सवलतीच्या दरातील धान्याचे वितरण अद्यापही सुरू करण्यात आले नाही. त्यानुषंगाने कोरोना काळात सवलतीच्या दरातील धान्याचा लाभ मिळणार तरी केव्हा, यासंदर्भात राज्यातील केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींकडून प्रतीक्षा केली जात आहे.
पुरवठा मंत्रालयाने मागितली धान्य वाटपाची माहिती!
राज्यातील केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींना गत मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीत सवलतीच्या दरात वाटप करण्यात आलेले धान्य व शिल्लक असलेला धान्यसाठा यासंदर्भात जिल्हानिहाय माहिती शासनाच्या पुरवठा मंत्रालयाने २५ सप्टेंबर रोजी राज्यातील जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयांकडून मागितली आहे.
एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक लाभार्थींना सवलतीच्या दरात धान्य वितरित करण्यासाठी धान्याचे नियतन मंजूर करण्यात आले आहे; परंतु धान्यसाठा अध्याप उपलब्ध झाला नाही. धान्यसाठा उपलब्ध झाल्यानंतर जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात धान्याचे वितरण सुरू करण्यात येईल.
- बी.यू. काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.