पीक कर्ज वाटप सुरू; कपाशीला एकरी २१ हजारांचे पीक कर्ज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 04:49 PM2020-05-03T16:49:00+5:302020-05-03T16:49:11+5:30
कोरडवाहू बीटीसाठी हेक्टरी ४३ हजार रुपये तर सोयाबीनला हेक्टरी ४५ हजार रुपये पीक कर्ज मिळणार आहे.
अकोला: या खरीप हंगामासाठी बँकांचे पीक कर्ज जाहीर झाले. अकोला जिल्ह्यात बागायती बीटी कपाशी लागवडीसाठी एकरी २१ हजार २00 रुपये कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोरडवाहू बीटीसाठी हेक्टरी ४३ हजार रुपये तर सोयाबीनला हेक्टरी ४५ हजार रुपये पीक कर्ज मिळणार आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे नियोजन करण्यात आले असून, प्रशासनाने बँकांना यासाठीच्या सूचना केल्या आहेत. जिल्ह्यात सोयाबीन, कापूस या पिकांची पेरणी सर्वात जास्त केली जाते. ओलिताच्या कपाशी लागवडीसाठी हेक्टरी ५३ हजार रुपये देण्यात येणार आहेत, म्हणजे एकरी २१ हजार २०० रुपये हे कपाशीसाठीच्या पीक कर्जाचे प्रमाण आहे. सोयाबीनला हेक्टरी ४५ हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच सोयाबीनला एकरी १८ हजार रुपये आहे. तूर पीक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतले जात असून, या पिकाला हेक्टरी ३६ हजार ७०० रुपये कर्ज मिळणार आहे. गतवर्षी ज्वारीचे पीक घेतले. यावर्षी खरीप ज्वारीला हेक्टरी २६ हजार रुपये पीक कर्ज दिले जाणार आहे. सूर्यफूल या पिकाला २६ हजार २०० रुपये असे सर्व खरीप हंगामातील पिकांचे दर निश्चित करण्यात आले. हे सर्व बागायती पिकांचे दर असून, कोरडवाहू पिकासाठी दर निश्चित करण्यात आले आहे.
यामध्ये कोरडवाहू बीटी कपाशीसाठी हेक्टरी ४३ हजार रुपये, संकरित ज्वारी २५ हजार रुपये, तूर पिकाला ३१ हजार ५०० रुपये, मूग आणि उडीद या पिकाला १९ हजार रुपये, तीळ पिकाला २३ हजार रुपये दिले जाणार आहे. जिल्ह्यात ओवा पीक घेण्याचे प्रमाण अलीकडे वाढले असून, खारपाणपट्ट्यातील शेतकरी ओवा पीक मोठ्या प्रमाणात घेत आहेत. याच अनुषंगाने यावर्षी ओवा पिकासाठी हेक्टरी १७ हजार रुपये कर्ज मिळणार आहे.
बागायती पिकांतील मिरचीला ७५ हजार ३०० रुपये केळी या पिकासाठी ९३ हजार ५०० रुपये कर्ज मिळणार आहे. हळद पिकालाही कर्ज मिळणार आहे. पपई ७० हजार, डाळिंब १ लाख २१ हजार, बटाटा पिकाला ७३ हजार कर्ज मिळेल.
रब्बी पिकाचाही दर निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये कोरडवाहू हरभºयाची २४ हजार, गहू ३५ हजार, करडई २७ हजार, कांदा ७३ हजार तर उन्हाळी भुईमूग पिकाला ३८ हजार रुपये पीक कर्ज मिळणार आहे.