दवाखाने सुरु करा; अन्यथा सेवा अधिग्रहित करु : जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 10:33 AM2020-05-02T10:33:02+5:302020-05-02T10:34:10+5:30
खाजगी डॉक्टर्सच्या सेवा अधिग्रहित करण्याच्या पयार्याचा अवलंब प्रशासन करेल असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला.
अकोला : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी लॉक डाऊन लागू करण्यात आले आहे. त्यातून वैद्यकीय सेवा वगळण्यात आल्या आहेत. या पार्श्वभुमिवर जिल्ह्यातील सर्व खाजगी प्रॅक्टीस करणारे डॉक्टर्स आपले दवाखाने, रुग्णालये सुरु ठेवतील असे अपेक्षित होते. मात्र तसे होताना दिसत नाही. अशा या आपत्तीच्या प्रसंगी खाजगी डॉक्टर्सने आपले दवाखाने, रुग्णालये तात्काळ सुरु करुन कोरोना संसर्ग प्रतिबंधाची उपाययोजना करुन रुग्णसेवा सुरु ठेवावी,अन्यथा खाजगी डॉक्टर्सच्या सेवा अधिग्रहित करण्याच्या पयार्याचा अवलंब प्रशासन करेल असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी झालेल्या डॉक्टर्सच्या बैठकीत दिला.
जिल्ह्यातील खाजगी डॉक्टर्सने त्यांच्या सेवा सुरु करुन समाजात दिसणारे संशयित कोवीड रुग्ण ओळखून ते शासकीय रुग्णालयांकडे तात्काळ पाठवावे यासाठी आज बैठक बोलावण्यात आली होती. ही बैठक आय एम ए या डॉक्टर्सच्या संघटनेसमवेत झाली.
या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसोले, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सहाय्यक आयुक्त अन्न व औषधे मेतकर तसेच अन्य अधिकारी व आय एम ए या संघटनेचे पदाधिकारी व डॉक्टर्स उपस्थित होते.
डॉक्टरांनी मांडल्या समस्या
या बैठकीत सुरुवातीला उपस्थित डॉक्टरांनी आपल्या अडचणी मांडल्या. तसेच त्यांनी केलेल्या सुचना व त्यांच्या समस्याही मांडण्यात आल्या. यावेळी काही डॉक्टर्सने कम्युनिटी दवाखाने वेगवेगळ्या भागात सुरु करण्याबाबतचा उपायही सुचविला. तसेच ६० वर्षे वयावरील डॉक्टर्सना या अत्यावश्यक सेवेतून वगळावे, इन्श्युरन्स सुरक्षा द्यावी , प्रतिबंधित क्षेत्रातील कर्मचारी वर्ग येऊ देण्याबाबत, अत्यावश्यक साहित्य व औषधे मिळण्याबाबत निर्माण होणाºया अडचणी याबाबत समस्या मांडल्या. त्यांच्या समस्यांच्या तांत्रिक बाबींबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण व अधिष्ठाता डॉ. घोरपडे यांनी मार्गदर्शन केले. या सभेचे संचलन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.