शिवणी विमानतळ विस्तारीकरणासाठी खासगी जमिनीची मोजणी सुरू करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 01:46 AM2018-04-15T01:46:57+5:302018-04-15T01:46:57+5:30
अकोला : शिवणी विमानतळ विस्तारीकरणासाठी ३४ हेक्टर ६ आर खासगी जमिनीची मोजणी सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १२ एप्रिल रोजी भूमी अभिलेख व विशेष भूसंपादन विभागाला दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शिवणी विमानतळ विस्तारीकरणासाठी ३४ हेक्टर ६ आर खासगी जमिनीची मोजणी सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १२ एप्रिल रोजी भूमी अभिलेख व विशेष भूसंपादन विभागाला दिले.
अकोल्याच्या शिवणी विमानतळ विस्तारीकरणासंदर्भात विमानतळावर बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, आमदार गोपीकिशन बाजोरिया, भारतीय विमान पत्तन प्राधिकरणचे नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे निर्देशक साहू व त्यांचे सहकारी उपस्थित होते. अकोल्याच्या शिवणी विमानतळाची धावपट्टी सध्या १ हजार ४00 मीटर लांबी व ४५ मीटर रुंदीची आहे. विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू करण्यासाठी धावपट्टीची लांबी १ हजार ८00 मीटर करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी आवश्यक असलेली डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची ६0 हेक्टर ६८ आर जमीन शासन आदेशानुसार संपादन करण्यात आली असून, ही जमीन गत २३ मे २0१६ रोजी भारतीय विमान पत्तन प्राधिकरणच्या ताब्यात देण्यात आली आहे. तसेच ३४ हेक्टर 0६ आर खासगी जमीन संपादन करण्याचे प्रस्तावित आहे. विमानतळावर एटीआर -४२ प्रकारची विमाने उतरण्यासाठी खासगी जमीन संपादन केल्याशिवाय विमानतळाचा विकास शक्य नसल्याचे भारतीय विमान पत्तन प्राधिकरणच्या नागपूर येथील विमानतळाचे निर्देशक साहू यांनी यावेळी सांगितले. विमानतळ विस्तारीकरणासाठी खासगी जमीन संपादनाकरिता जमिनीची मोजणी करण्यासाठी येणारा खर्च भागविण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनामार्फत गत १५ मार्च २0१७ रोजी मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जमीन मोजणीसाठी १८ लाख १५ हजार रुपयांचा भरणा भूमी अभिलेख विभागाच्या अकोला उप अधीक्षक कार्यालयाकडे करण्यात आला आहे. त्यानुषंगाने विमानतळ विस्तारीकरणासाठी खासगी जमिनीची मोजणी सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले. तसेच भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात आवश्यक प्रशासकीय आदेश व निधी मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी यावेळी सांगितले.