कोविड प्लाझ्मा विलगीकरण कक्ष तत्काळ सुरू करा : युवाविश्व संघटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:13 AM2021-05-03T04:13:23+5:302021-05-03T04:13:23+5:30
पालकमंत्री बच्चू कडू यांनी दखल घेऊन कक्ष सुरू करण्याचा दिला आदेश अकोला : येथील युवाविश्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. ...
पालकमंत्री बच्चू कडू यांनी दखल घेऊन कक्ष सुरू करण्याचा दिला आदेश
अकोला : येथील युवाविश्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. संतोष गावंडे यांनी जिल्हा सर्वोपचार कोविड प्लाझ्मा विलगीकरण कक्ष सुरू करण्याकरिता शनिवारी पालकमंत्री बच्चू कडू यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. पालकमंत्र्यांनी हा कक्ष तातडीने सुरू करण्याचा आदेश दिला.
कोविड या आजारामध्ये इतर औषधोपचारासोबत प्लाझ्मा हे प्रतिजैविक म्हणून काम करते. अकोला जिल्ह्यात प्लाझ्मा विलगीकरण कक्ष फक्त जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आला होता, जिल्ह्यात इतर कोणत्याही रक्तपेढीला ती मान्यता नाही. असे असताना देखील आणि मध्यंतरीच्या कालावधीत राज्यात अकोला आरोग्य विभागामध्ये कोविड-१९ च्या रुग्णांचे प्रमाण सगळ्यात जास्त वाढले होते. तरीदेखील जवळपास मागील सात महिन्यांपासून जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील कोविड प्लाझ्मा विलगीकरण कक्ष बंद करण्यात आला होता. याचा फार मोठा त्रास कोविड रुग्णांना आाणि त्यांचे नातेवाईक यांना होत होता. नाइलाजास्तव रुग्णांच्या नातेवाइकांना अमरावती व नागपूर येथून प्लाझ्मा आणावा लागत होता.
अकोला जिल्ह्यातील कोविड रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना होणारा मनस्ताप व आर्थिक भुर्दंड लक्षात घेता जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाने कोविड प्लाझ्मा विलगीकरण कक्ष तत्काळ सुरू करावा, अशी मागणी अॅड. संतोष गावंडे यांनी महाराष्ट्रदिनी सकाळी पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली. यावेळी अॅड. गावंडे यांच्यासोबत साथ ब्लड हेल्पलाइनचे आशिष कसले, ''युवाविश्व''चे अॅड. ऋषिकेश जुनारे, जया बोचे जुनारे, अविनाश नाकट व संदीप महल्ले उपस्थित होते.
पालकमंत्री यांनी या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन ध्वजारोहण झाल्याबरोबर ताबडतोब सर्वोपचार रुग्णालयात जाऊन कोविड प्लाझ्मा विलगीकरण कक्ष तत्काळ कार्यान्वित करण्याचा आदेश दिला.