धार्मिक स्थळे हटवण्याला प्रारंभ
By admin | Published: January 6, 2016 01:57 AM2016-01-06T01:57:08+5:302016-01-06T01:57:08+5:30
अकोला महापालिका प्रशासनाने शहरात २00९ नंतर उभारलेली धार्मिक स्थळे हटविण्याची तयारी केली आहे.
अकोला: महापालिका प्रशासनाने शहरात २00९ नंतर उभारलेली धार्मिक स्थळे हटविण्याची तयारी केली आहे. विधिवत पूजा करून सदर धार्मिक स्थळे हटवण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत असून, पूर्व झोनमध्ये पुढाकार घेत नागरिकांनी सुमारे दहा धार्मिक स्थळे हटवल्याची माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून महापालिका प्रशासनाकडून शहरातील धार्मिक स्थळे हटविण्याच्या कारवाईला सुरुवात होणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार मनपा आयुक्त अजय लहाने यांनी पहिल्या टप्प्यात २00९ नंतर उभारलेल्या धार्मिक स्थळांची यादी तयार केली असून, यामध्ये चारही झोन मिळून ५६ स्थळांचा समावेश आहे. अनेक भागात मंदिर, पूजनीय व्यक्तींचे पुतळे, प्रतिमा, नामफलक लावण्यात आले आहेत. शहरात चारही झोनमध्ये एकाच दिवशी स्थळे हटविण्याला सुरुवात केली जाईल. त्यापूर्वी नागरिकांनी पुढाकार घेत देवी-देवतांच्या प्रतिमा, पुतळ्य़ांची विधिवत पूजा करून ते हटविण्याचे आवाहन प्रशासनाकडून सातत्याने केले जात आहे. प्रशासनाच्या आवाहनाला पूर्व झोनमधील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पूर्व झोनमध्ये १८ स्थळे हटविली जाणार होती. यापैकी तब्बल दहा स्थळे नागरिकांनी स्वत:हून काढून घेतली. दक्षिण झोनमध्ये २४ पैकी केवळ दोन स्थळं हटवण्यात आल्याची माहिती आहे.