जिल्हास्तरीय असंसर्गजन्य आजार शोधमोहिमेस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 01:51 PM2019-09-16T13:51:36+5:302019-09-16T13:51:51+5:30
जिल्हास्तरीय शोधमोहिमेचे उद्घाटन शुक्रवार, १३ सप्टेंबर रोजी कापशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले.
अकोला : कुठल्याही शासकीय योजनेचे किंवा मोहिमेचे यश हे सर्वसामान्यांच्या सहभागातूनच यशस्वी होतात. त्यामुळे नागरिकांनी शासनाच्या कुष्ठरोग, क्षयरोग व असंसर्गजन्य आजार शोधमोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद सीईओ आयुष प्रसाद यांनी केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कुष्ठरोग, क्षयरोग व असंसर्गजन्य आजारांची विशेष शोधमोहीम राज्यभरात राबविण्यात येत आहे. जिल्हास्तरीय शोधमोहिमेचे उद्घाटन शुक्रवार, १३ सप्टेंबर रोजी कापशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उद्घाटकपदी आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, सहायक संचालक कुष्ठरोग डॉ. एम. एम. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मेघा गोळे, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. मनीष शर्मा, प्राथमिक आरोग्य केंद्र कापशीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण सरोदे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. एम. एम. राठोड यांनी केले. संचालन जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी यांनी केले. आभार डाबेराव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. संदीप बाबर, डॉ. मेघा सावळे, डॉ. प्रशांत शिरसाट, जिल्हा आशा समन्वयक सचिन उनवणे, आरोग्य सेविका खेंडकर, आरोग्य सहायक प्रकाश नागे व संक्षय अकोटकर यांनी परिश्रम घेतले.
२८ सप्टेंबरपर्यंत चालणार मोहीम
- शुक्रवार, १३ सप्टेंबरपासून सुरू झालेली असंसर्गजन्य आजार शोधमोहीम २८ सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येईल.
- मोहिमेत आशा वर्कर्स महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
- रुग्ण आढळल्यास त्यावर सर्वप्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र, नंतर ग्रामीण रुग्णालय व गरज पडल्यास जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचार केला जाणार आहे.
अशी असेल मोहीम
- असंसर्गजन्य आजारांची अशी ठोस लक्षणे दिसून येत नाहीत.
- यासाठी आरोग्य सेविका दहा प्रश्न विचारणार आहेत. व्यक्तीचे वय, वजन, पोटाचा घेर या गोष्टींची माहिती घेतली जाईल.
- यावरून विविध आजारांच्या लक्षणांची पडताळणी केली जाईल.
- त्यानुसार, तपासणीनंतर उपचारासाठी रुग्णाला जवळच्या आरोग्य केंद्रावर पाठविण्यात येईल.
- ग्रामीण भागातील शंभर टक्के, तर शहरी भागातील ३० टक्के नागरिकांची तपासणी करण्यात येईल.