रस्त्यांचे काम सुरू करण्यासाठी तेल्हाऱ्यात उपोषण सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:13 AM2021-06-27T04:13:54+5:302021-06-27T04:13:54+5:30
तेल्हारा : तालुक्याशी जोडणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे तालुक्यात अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे संबंधित विभागाचे ...
तेल्हारा : तालुक्याशी जोडणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे तालुक्यात अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्याला जोडणाऱ्या चारही रस्त्यांचे काम त्वरित सुरू करा, अन्यथा दि. २६ जूनपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा, सामाजिक कार्यकर्ते विशाल नांदोकार यांनी दिला होता. त्यानुसार सामाजिक कार्यकर्ते पत्रकार विशाल नांदोकार यांनी शनिवार, २६ जूनपासून शहरातील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली असून, विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे.
तेल्हारा तालुक्यातील तेल्हारा-आडसूळ, तेल्हारा-हिवरखेड, तेल्हारा-वणी वारुळा, तेल्हारा-वरवट या चारही बाजूंच्या मुख्य रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांचे काम संबंधित ठेकेदाराने अर्धवट सोडून या रस्त्यावर मातीमिश्रीत टाकल्यामुळे पावसाच्या दिवसात वाहन घसरुन अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे तालुक्यातील नागरिकांसह रुग्णांना व वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून, अनेकांना जीव गमवावा लागल्याचा आरोप निवेदनातून केला आहे.
--------------------
रस्त्याच्या कामासाठी हजारो वृक्षांची कत्तल
तालुक्यात रस्त्यांची कामे सुरू आहेत. विकासाच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे. झाडे तोडल्यानंतर नव्याने झाडे लावण्याचे कोणतेही प्रयोजन संबंधित ठेकेदाराने केले नसल्याचा आरोप विशाल नांदोकार यांनी दिलेल्या निवेदनातून केला आहे. यापूर्वीही रस्त्यांचे काम त्वरित करण्यासाठी निवेदन देऊन मागणी केली होती; मात्र कामाला गती न मिळाल्याने विशाल नांदोकार २६ जूनपासून सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.