अकोला फुटबॉलच्या नव्या अध्यायाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 04:50 PM2019-09-01T16:50:09+5:302019-09-01T16:51:47+5:30
आता महिला फुटबॉल खेळाडूंसाठी अकादमीची स्थापना करण्यात आली.
- नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: फुटबॉल क्षेत्रात ‘मिनी कोलकाता’ अशी ओळख प्राप्त असलेल्या अकोला जिल्ह्यातून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरुष फुटबॉलपटू तयार झाले आहेत; मात्र आता महिला फुटबॉल खेळाडूंसाठी अकादमीची स्थापना करण्यात आली असून, अकोला वरिष्ठ फुटबॉल महिला संघ प्रथमच तयार झाला आहे. यामुळे अकोल्यात फुटबॉलच्या नव्या अध्यायाला प्रारंभ झाला आहे.
अकोला फुटबॉल अकादमी नावाने आरडीजी महिला महाविद्यालयाच्या विशाल प्रांगणात फुटबॉलचे नियमानुसार मैदान तयार करण्यात आले आहे. या अकादमीला आरडीजी स्पोटर््स अकादमीचे सहकार्य लाभत आहे. पूर्वी नावाजलेला तेलगू स्पोटर््स क्लबच्या माजी खेळाडूंनी अकोल्यात फुटबॉल जिवंत राहावा, यासाठी अकादमीची स्थापना केली. अकादमीत उदयोन्मुख महिला खेळाडूंना नि:शुल्क फुटबॉल प्रशिक्षण देण्यात येत आहे. राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते फुटबॉलपटू रवी संगेकर आणि सचिन मजेठिया यांच्या मार्गदर्शनात दोन महिन्यांपासून महिला फुटबॉलपटू प्रशिक्षण घेत आहेत. अल्पावधीतच तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्पर्धा खेळण्यास येथील प्रशिक्षणार्थी सज्ज झाल्या आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाद्वारे आयोजित आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत या मुली खेळप्रदर्शन करणार आहेत. अकोला फुटबॉलच्या इतिहासात नव्या अध्यायाला यानिमित्त सुरुवात झाली आहे. आजपर्यंत वैयक्तिक निवड चाचणीकरिता विद्यापीठ संघात निवड होण्याकरिता अकोल्यातील महिला फुटबॉलपटू जायच्या; परंतु यावेळी पहिल्यांदा महिला फुटबॉल संघ विद्यापीठाच्या स्पर्धेत खेळप्रदर्शन करणार आहे, हे येथे उल्लेखनीय आहे. दहा-पंधरा वर्षांपूर्वी अकोल्याची मधू सोनकांबळे, राणी तायवाडे यांनी राष्ट्रीय व राज्य फुटबॉल स्पर्धा गाजविल्या. काही मुली लालबहादूर शास्त्री क्रीडांगणावर सराव करायच्या; मात्र समाजबंधने आणि टारगट मुलांच्या त्रासापायी या मुलींना सराव करता यायचा नाही. मैदानाच्या समस्येमुळे मोकळेपणाने खेळू शकत नव्हत्या. मधू व राणीला सरावासाठी मैदान आणि अन्य सुविधा मिळाल्या असत्या तर आज अकोला महिला फुटबॉलचा इतिहास निश्चितच वेगळा असता. आता मात्र अकोला फुटबॉल अकादमीमुळे मुलींना मोकळेपणे खेळ सराव करण्यासाठी मैदान उपलब्ध झाले आहे. जवळपास २० ते २५ मुली नियमित सरावाला येतात. रवी संगेकर, सचिन मजेठिया तसेच आंतरराष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षक धीरज मिश्रा यांचे मार्गदर्शन मुलींना लाभत आहे. सध्या खेळाडूंना प्राथमिक सुविधा उपलब्ध आहेत. भविष्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा अकादमीत उपलब्ध करू न दिल्या जाणार असल्याचे प्रशिक्षक रवी संगेकर यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना सांगितले.
गुणवान खेळाडूंची कमतरता नाही
आपल्याकडे शालेय स्तरावर अनेक गुणवान खेळाडू पाहायला मिळतात; मात्र शाळेतून बाहेर पडल्यानंतर मुलांना प्लॅटफार्म मिळत नाही. ईशान्य भारतातील मुले-मुलींचा भारतीय फुटबॉल संघात भरणा असतो. या मुलांसोबत किंवा विदेशी मुलांसोबत तुलना केली तर आपल्या विदर्भातील खेळाडू कुठेही कमी नाहीत; मात्र उत्तम दर्जाच्या खेळ सुविधा उपलब्ध करू न दिल्यास निश्चितच आपले खेळाडू पुढे जातील. पालकांनीदेखील मुला-मुलींना फुटबॉल खेळण्यास प्रोत्साहित करायला पाहिजे. फुटबॉलमुळे बालकांचा सर्वांगीण विकास साधता येतो.
- रवी संगेकर,
राष्ट्रीय फुटबॉलपटू व प्रशिक्षक.