ऑनलाइन शिक्षण सुरू; नेटवर्क नाही तेथे दूरदर्शन, आकाशवाणीचा वापर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:14 AM2021-07-15T04:14:55+5:302021-07-15T04:14:55+5:30
मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाइन अध्यापनासाठी परवानगी देण्यात आली आहे; मात्र शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याची अट असून, ...
मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाइन अध्यापनासाठी परवानगी देण्यात आली आहे; मात्र शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याची अट असून, ५० टक्क्यांचा निकष आहे. शिक्षक ऑनलाइन अध्यापन शाळेसह घरातून करीत आहेत. नेटवर्क समस्या असणाऱ्या गावात शाळेत शिक्षक जात असले तरी मुलांना प्रत्यक्ष भेटत नाहीत; मात्र पालकांच्या माध्यमातून अभ्यासाचे धडे देत आहेत. स्वाध्याय पुस्तिका मुलांना वितरित करण्यात आल्या असून, दररोजचा अभ्यास स्वाध्याय पुस्तिकेद्वारे सोडवून घेण्यात येत आहे. शिवाय दर आठवड्याला मुलांनी केलेला अभ्यास तपासून देत आहेत, मुलांच्या पालकांकडे मोबाइल नसल्यास शेजारील ग्रामस्थांच्या, विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर अभ्यास पाठविला जात आहे. विद्यार्थ्यांना शिक्षक मोबाइलवर पीडीएफ फाईल पाठवित असून दररोज मुले वहीवर अभ्यास लिहून काढत आहेत. ऑफलाइनच्या मुलांना झेरॉक्स काढून शिक्षकांनी दिल्या आहेत. ऑनलाइनमध्ये मुले प्रत्यक्ष समोर नाहीत, ऑफलाइनमध्ये मुले स्वत: अभ्यास करीत आहेत. त्यामुळे मुले मागे राहत आहेत. गणित, विज्ञानसारख्या विषयांत मुले मागे पडत आहेत.
----------
नेटवर्क नसल्याने अडचण
तालुक्यातील ग्रामीण भागात नेटवर्क असलेल्या ठिकाणी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे; मात्र नेटवर्कअभावी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी दूरदर्शन, आकाशवाणीचा वापर करण्यात येत आहे. प्रसंगी शेजारील ग्रामस्थांच्या मोबाइलवर गृहपाठ पाठविला जात आहे.
------------------
ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण सुरू असल्याने त्यामध्ये काही समस्या असल्यास ती दूर करता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासाप्रती नकारात्मक होत आहेत. ग्रामीण भागातील शाळा त्वरित सुरू करणे गरजेचे आहे.
-प्रा. भास्कर काळे, देशभक्त विद्यालय, तांदळी खु.