पंचनामे करून तूर खरेदी सुरू करा!
By admin | Published: April 27, 2017 01:35 AM2017-04-27T01:35:35+5:302017-04-27T01:35:35+5:30
अकोला- तुरीचे पंचनामे करून तूर खरेदी तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी सायंकाळी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना (डीएमओ) दिले.
अकोला : शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रांवरील तुरीचे पंचनामे करून तूर खरेदी तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी सायंकाळी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना (डीएमओ) दिले. त्यामुळे जिल्ह्यातील ‘नाफेड’च्या तूर खरेदी केंद्रांवर मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
हमीदराने ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी गत २२ एप्रिल रोजी सायंकाळपासून बंद करण्यात आली. नाफेडद्वारे तूर खरेदी बंद करण्यात आली आल्याने, जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या पाच खरेदी केंद्रांवर गत दीड महिन्यापासून मोजमापाच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या १ हजार ९६३ ट्रॅक्टरमधील १ लाख ७ हजार ९७ क्विंटल तुरीचे मोजमाप रखडले होते. नाफेडद्वारे हमीदराने तूर खरेदी बंद करण्यात आली आणि बाजारात व्यापाऱ्यांकडून तुरीला योग्य भाव मिळत नसल्याने, तूर कोणाला आणि कुठे विकणार, याबाबतचा प्रश्न तूर उत्पादक शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला होता. या पृष्ठभूमीवर तूर खरेदी सुरू करण्यासाठी आंदोलनेही करण्यात आली. दरम्यान, तूर खरेदी केंद्रांवरील मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेल्या तुरीचे पंचनामे करून तूर खरेदीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला. यासंबंधीचा आदेश बुधवार, २६ एप्रिल रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाला शासनामार्फत प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यातील नाफेडद्वारे तूर खरेदीच्या पाचही खरेदी केंद्रांवर मोजमाप बाकी असलेल्या तुरीचे पंचनामे करून तूर खरेदी तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांचा समावेश असलेल्या पथकांकडून खरेदी केंद्रांवरील तुरीचे पंचनामे करण्यात येणार आहे.
बाजार समितीमध्ये शेतकरी सात-बारा आणल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या वतीने जे नाव सांगितले जाते, त्या नावानेच टोकन दिले जाते; परंतु हयात किंवा मृत्यूच्या दाखल्याची मागणी गेटवर मागणी केल्या जात नाही.
- माधव पाथ्रीकर, सचिव, तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती.
हा प्रकार जर सत्य असेल, तर दोषींवर कारवाई करण्यात यावी, असे प्रकार होणे अत्यंत गंभीर बाब आहे.
- श्याम भोपळे, विरोधी पक्षनेता, तेल्हारा.
सात-बाराप्रमाणे सदर शेतकऱ्याची नोंदणी झाली तसेच मोजमापही झाले. शेतकरी मयत असताना असे प्रकार करणे योग्य नाही. ज्यांच्या नावे तूर मोजली त्यांच्या नावाने धनादेश देऊ.
- मनोज वाजपेयी, डीएमओ, नाफेड, अकोला.