मनुष्यबळ उपलब्ध करून सुपर स्पेशालीटी हाॅस्पिटल सुरू करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:21 AM2021-05-25T04:21:48+5:302021-05-25T04:21:48+5:30
अकोला: जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजनांचा आढावा घेत, अकोला शहरातील सुपर स्पेशालीटी हाॅस्पिटलकरिता तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून ...
अकोला: जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजनांचा आढावा घेत, अकोला शहरातील सुपर स्पेशालीटी हाॅस्पिटलकरिता तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून १ जूनपर्यंत हाॅस्पिटल सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी जिल्हा शल्यचिकित्सक व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी)प्रशासनाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, शासकीय व खासगी कोविड रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ आहे, तसेच कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी २५० खाटांची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुषंगाने आवश्यक असलेले मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून, १ जूनपर्यंत सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेेंद्र पापळकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला दिले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी जिल्ह्यातील शासकीय कोविड रुग्णालयांमधील उपचार सुविधांमधील अडचणींची जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी माहिती घेतली. जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त नीमा अरोरा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डाॅ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. राजकुमार चव्हाण, निवासी उप-जिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.