अकोला शहरातील दोन्ही उड्डाण पुलांच्या कामास फेब्रुवारीत प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 02:44 PM2018-12-12T14:44:22+5:302018-12-12T14:44:40+5:30
अकोला : शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी अशोक वाटिका ते रेल्वेस्थानकापर्यंत आणि सिंधी कॅम्प ते जेलपर्यंत प्रस्तावित असलेल्या उड्डाण पुलांच्या बांधकामास फेब्रुवारीत सुरुवात होणार आहे.
अकोला : शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी अशोक वाटिका ते रेल्वेस्थानकापर्यंत आणि सिंधी कॅम्प ते जेलपर्यंत प्रस्तावित असलेल्या उड्डाण पुलांच्या बांधकामास फेब्रुवारीत सुरुवात होणार आहे. हरियाणाच्या हिसार येथील जान्डू कन्स्ट्रक्शन कंपनीला याचे कंत्राट दिले असून या कंपनीचे साहित्य सध्या बुलडाण्यातच असल्याने ते लवकरच अकोल्यात आणणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. १६३.९८ कोटींच्या खर्चातून उड्डाण पुलाचे बांधकाम होणार असून, पुलाच्या प्रत्यक्ष बांधकामाला फेब्रुवारी महिन्यात सुरुवात होणार आहे. तब्बल दोन वर्षे या उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू राहणार असल्याचे संकेत आहेत.
अशोक वाटिका ते रेल्वेस्थानकापर्यंत आणि सिंधी कॅम्प ते जेलपर्यंतचा एक लहान उड्डाणपूल अकोला शहरातील वाहतूक वळविण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दोन फ्लाय ओव्हर, एक अंडरपास आणि सर्व्हिस रोडचा यामध्ये समावेश राहणार आहे. अशोक वाटिका चौकापासून अकोला रेल्वे स्टेशनपर्यंत साडेतीन किलोमीटर अंतरापर्यंत हा उड्डाणपूल विस्तारला जाणार आहे. अमरावती रोड आणि दुसरीकडे दक्षता नगर मार्गाकडे जाण्यासाठी या उड्डाण पुलास मार्ग राहतील. अशोक वाटिकेपासून निघणाऱ्या या उड्डाण पुलास टॉवरच्या अलीकडे दोन्ही बाजंूनी फ्लाय ओव्हर जोडला जाईल. त्यानंतर अकोला जिल्हा न्यायालयाच्या पुढे हा उड्डाणपूल लँड होईल. मध्यवर्ती बसस्थानकाजवळ अंडरपास दिला जाणार असून, उड्डाण पुलास सर्व्हिस रोड दिला जाणार आहे.
साडेतीन वर्षांआधी नितीन गडकरी यांनी या उड्डाण पुलाची घोषणा केली होती, त्यानंतर लगेच त्यांनी या पुलाचे भूमिपूजनही केले होते. त्यानंतर जेव्हा एका कार्यक्रमानिमित्त नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यात आले, तेव्हा त्यांनी लवकरच या कामास प्रारंभ होणार असल्याचे संकेत दिले होते. अखेर या बांधकामाच्या निविदेला १९ नोव्हेंबर रोजी मंजूरी मिळाली असून, हे काम हरियाणाच्या हिसार येथील जान्डू कन्स्ट्रक्शन कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. आता १५ डिसेंबरपर्यंत कन्स्ट्रक्शन कंपनीला निविदा रकमेच्या पाच टक्के रक्कम बँक गॅरंटी म्हणून जमा करावी लागणार आहे.
सिंधी कॅम्पकडून येणारी वाहतूक आणि जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक वळविण्यासाठी दीड किलोमीटरचा लहान उड्डाणपूल आहे. त्यानंतर अशोक वाटिकेपासून रेल्वेस्थानकापर्यंत दुसरा उड्डाणपूल राहणार आहे. अशोक वाटिका ते जेल चौकापर्यंत काही अंतरावर मार्ग राहणार असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही.
-विलास ब्राह्मणकर, प्रकल्प प्रमुख अभियंता, अमरावती.