शेतरस्त्यांची कामे सुरू करा! - पालकमंत्र्यांचे रोहयो विभागाला पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 01:04 PM2019-01-01T13:04:46+5:302019-01-01T13:04:59+5:30
अकोला : आॅक्टोबर २०१७ पासून निधी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील शेतरस्त्यांची कामे पूर्णत: थांबविण्यात आल्याचे चित्र आहे.
अकोला : आॅक्टोबर २०१७ पासून निधी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील शेतरस्त्यांची कामे पूर्णत: थांबविण्यात आल्याचे चित्र आहे. हा प्रकार सर्वच तालुक्यांमध्ये घडला असून, बाळापूर तालुक्यातील कामे संबंधितांच्या निवेदनानुसार तत्काळ सुरू करावी, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रोजगार हमी विभागाला दिले आहेत.
रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात गेल्यावर्षी २०१७-१८ पासून शेतरस्ते, सिंचन विहिरी, जनावरांचे गोठे, अंतर्गत रस्ते, वृक्ष लागवड व संगोपन ही कामे सुरू आहेत. त्या कामावरील अकुशल मजुरीची रक्कम काही प्रमाणात अदा करण्यात आली, तर कुशल देयकांमध्ये गिट्टी, मुरूम, डब्बर या साहित्याची देयकांसाठी आवश्यक निधी शासनाकडून मिळालेला नाही. डिसेंबर २०१८ मध्ये सुरू असलेली अकोला जिल्ह्यातील ८७४ शेतरस्त्यांच्या कामे रखडली आहेत. शेतरस्त्यांची २५३ कामे मंजूर असताना सुरूच झालेली नाहीत. सोबतच ४७२ कामांचा प्रस्ताव तयार असताना त्याला मंजुरीही देण्यात आलेली नाही. रोजगार हमी योजनेसाठी निधीचा कमालीचा तुटवडा गत वर्षभरापासून आहे. त्याकडे केंद्र शासनासह राज्य शासनानेही कमालीचे दुर्लक्ष केले. परिणामी, शेतरस्त्यांची कामे अर्धवट राहणे, मजुरांच्या हाताला काम नसणे, साहित्याचा पुरवठा करणाऱ्यांना मोबदला न मिळण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याबाबत बाळापूर तालुक्यातील खिरपुरी बुद्रूक ग्रामपंचायतचे उपसरपंच अजय चिंचोलकार यांनी पालकमंत्री डॉ. पाटील यांना निवेदन देत कामे सुरू करण्याची मागणी केली. त्यानुसार खिरपुरी बुद्रूक, बारलिंगा, दधम व बटवाडी या गावांमध्ये अपूर्ण असलेली कामे सुरू करण्याचे पत्र पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांना दिले आहे.