न्यू तापडिया नगरमधील उड्डाण पुलाच्या कामाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:42 PM2019-01-16T12:42:32+5:302019-01-16T12:43:02+5:30
खासदार संजय धोत्रे यांचे प्रयत्न व आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत ५० कोटी रुपये प्राप्त होऊन उड्डाण पुलाच्या कामाला प्रत्यक्षात प्रारंभ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
अकोला: महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या न्यू तापडिया नगर, खरप, पाचपिंपळ, घुसर, आपातापा आदी ग्रामीण भागात जाण्यासाठी नागरिकांना रेल्वे क्रॉसिंग पार करून जावे लागत होते. रेल्वेगाड्यांमुळे या ठिकाणी वाहतुकीची मोठी क ोंडी निर्माण होत असल्याने उड्डाण पुलाची मागणी जोर धरू लागली होती. खासदार संजय धोत्रे यांचे प्रयत्न व आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत ५० कोटी रुपये प्राप्त होऊन उड्डाण पुलाच्या कामाला प्रत्यक्षात प्रारंभ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
अकोला ते गायगाव मार्गावरील डाबकी रोड येथील उड्डाण पुलाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. याच धर्तीवर न्यू तापडिया नगर, खरप, पाचपिंपळ, घुसर, आपातापा आदी भागात जाण्यासाठी सातव चौकानजीकच्या रेल्वे क्रॉसिंगजवळ उड्डाण पुलाचे निर्माण करण्याची मागणी नागरिकांनी लावून धरली होती. या ठिकाणी वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण होत असल्याने घुसर, आपातापा आदींसह इतर ग्रामीण भागातील नागरिकांना अकोट फैल मार्गे शहरात प्रवेश करावा लागत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांसह रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेता खासदार संजय धोत्रे यांनी मध्य रेल्वे व दक्षिण रेल्वे प्रशासनासोबत संपर्क साधून उड्डाण पुलासाठी आराखडा तयार करून घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधीची मागणी केली असता, केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत ५० कोटींचा निधी प्राप्त झाला. उड्डाण पुलाच्या बांधकामात येणाºया संभाव्य अडचणी दूर करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी मध्य रेल्वे व दक्षिण रेल्वे प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला. त्यानंतर उड्डाण पुलाची निविदा प्रकाशित करण्यात आली.
७८८ मीटर लांबीच्या कामाला प्रारंभ
उड्डाण पुलाच्या कामाला सातव चौकापासून सुरुवात झाली आहे. पुलाची एकूण लांबी ३२५ मीटर असून, त्यावर ४३३ मीटर अंतराच्या प्रशस्त रस्त्याचे निर्माण होणार आहे. या कामासाठी नांदेड येथील शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.