एमआयडीसीत फायर स्टेशनच्या कामास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:49 AM2017-09-07T00:49:11+5:302017-09-07T00:49:30+5:30
वर्षोगणतीच्या बहुप्रतीक्षेनंतर मंजूर झालेल्या अकोल्याच्या औद्योगिक वसाहतीमधील फायर स्टेशनच्या कामास अखेर बुधवारी प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली. पाच कोटी रुपयांच्या खर्चांतून दीड वर्षांच्या आत अद्ययावत केंद्र प्रत्यक्षात साकारले जाणार आहे. फायर स्टेशनची उभारणी झाल्यास केवळ एमआयडीसीलाच नव्हे, अकोला महापालिकेसह जिल्ह्यातील तालुक्यांनादेखील त्याचा लाभ होणार आहे.
संजय खांडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वर्षोगणतीच्या बहुप्रतीक्षेनंतर मंजूर झालेल्या अकोल्याच्या औद्योगिक वसाहतीमधील फायर स्टेशनच्या कामास अखेर बुधवारी प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली. पाच कोटी रुपयांच्या खर्चांतून दीड वर्षांच्या आत अद्ययावत केंद्र प्रत्यक्षात साकारले जाणार आहे. फायर स्टेशनची उभारणी झाल्यास केवळ एमआयडीसीलाच नव्हे, अकोला महापालिकेसह जिल्ह्यातील तालुक्यांनादेखील त्याचा लाभ होणार आहे.
अकोल्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये आग लागली, तर महापालिका प्रशासनाच्या अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात येते. अनेकदा ही यंत्रणा कमकुवत पडल्याने अमरावती आणि इतरत्र ठिकाणाहून पाण्याचे बंब मागविले जातात. स्थानिक औद्योगिक वसाहतीमध्ये ८९0 विविध उद्योग सक्रिय असून, कोट्यवधीचा महसूल गोळा होतो. त्या तुलनेत फायर स्टेशन येथे असावे ही बाब न्यायीक होती. अनेक वर्षांपासूनची ही मागणी प्रत्यक्षात कधी होते, याकडे अकोला इंडस्ट्रिज असोसिएशनचे लक्ष लागले होते. दरम्यान, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे आणि आमदारांनीदेखील याचा पाठपुरावा केला. फायर स्टेशनची मागणी शासन स्तरावर मंजूरही झाली. जुन्या बीके चौकात हे फायर स्टेशन उभारले जाणार होते. मात्र, पुन्हा जागेचा तिढा निर्माण झाला. ही जागा पुन्हा बदलली गेली. अखेर फायर स्टेशन येवता मार्गाच्या नवीन विकसित क्षेत्रात हलविले गेले. नव्याने विकसित होत असलेल्या येवता मार्गावरील पावणे दोन एकराच्या प्रशस्त परिसरात अद्ययावत असे फायर स्टेशन उभारले जात आहे. बुधवारी औरंगाबाद येथील ऋषिकेश कन्स्ट्रक्शन कंपनीने चतुर्सिमा आखून प्रत्यक्ष कामास प्रारंभ केला. पावणे दोन एकराच्या चतुर्सिमेची लांबी-रूंदी मोजून कंपनीने प्रकल्प हाती घेतला आहे.
निविदा मंजुरीनंतर बुधवारी या कामास सुरूवात झाली आहे. पाच कोटी रुपयांच्या खर्चातून पाच भव्य इमारती उभारल्या जाणार आहेत. फायर स्टेशन, अँडमीन बिल्डिंग, अधिकारी श्रेणी २ आणि ३ साठीचे निवासस्थान, वेअर हाऊस, आवार भिंत, परेड ग्राऊंड आदींचे निर्माण केले जाणार आहे.
औरंगाबादच्या ऋषिकेश कन्स्ट्रक्शन कंपनीला अकोला फायर स्टेशन बांधकामाचा कंत्राट दिला गेला असून, बुधवारी या कंपनीच्या अधिकार्यांनी या प्रकल्पाचे कामास सुरूवात केली. यावेळी एमआयडीसीचे सर्व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. दीड वर्षांच्या आत हा प्रकल्प उभारला जाणार आहे.
-राहुल बन्सोड, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी अकोला.
-