शेगाव-पंढरपूर पालखी मार्गाचे काम सुरू करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:26 AM2021-06-16T04:26:39+5:302021-06-16T04:26:39+5:30
बाळापूर विधानसभा मतदारसंघातून जाणाऱ्या शेगाव ते पंढरपूर पालखी मार्गाचे काम सुरू करण्यात आले होते. उन्हाळ्यात हा पालखी मार्ग खोदून ...
बाळापूर विधानसभा मतदारसंघातून जाणाऱ्या शेगाव ते पंढरपूर पालखी मार्गाचे काम सुरू करण्यात आले होते. उन्हाळ्यात हा पालखी मार्ग खोदून ठेवण्यात आला होता. या मार्गाने ये-जा करण्याऱ्या नागरिकांना धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागला. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने खोदून ठेवलेल्या रस्त्यात पावसाचे पाणी साचते. त्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही. या साचलेल्या पाण्याच्या चिखलात वाहने फसतात. दुचाकी घसरण्याचे प्रकार अनेक वेळा घडत असल्याचे दिसून येते. या रस्त्याचे काम सुरू होते अन् बंद पडते त्यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. पावसाळ्यात या रस्त्याने ये-जा करणे त्रासदायक ठरू शकते. खोदून ठेवलेला हा मार्ग अपघातास निमंत्रण देणारा ठरू शकतो!
शेगाव ते पंढरपूर पालखी मार्ग हा शेगाव, नागझरी मार्गे अकोला ते वाडेगाव मार्गे पंढरपूर असल्याचे समजते. हा पालखी मार्ग भाविक व नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून साकारणार असलेल्या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांची माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी रविवारी नागपूर येथे भेट घेतली. यावेळी भाजप नेते डॉ. अशोक ओळंबे, भाजप नेते राजेंद्र टाकळकर हजर होते. शेगाव पालखी मार्गाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंंद्र फडणवीस यांची भेट घेऊन माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी निवेदन दिले.