विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस ९ ऑक्टोबरपासून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 02:47 AM2017-10-07T02:47:04+5:302017-10-07T02:47:13+5:30
अकोला : तब्बल सहा महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचा तिढा सुटला असून, येत्या ९ ऑक्टोबर २0१७ पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात निवडलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला विलंब झाल्याने विधी महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेवर मोठा परिणाम दिसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

मेडिकल, इंजिनिअरिंग अभ्यासक्रमानुसार विधीची प्रवेश प्रक्रियादेखील केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने व्हावी, असा प्रस्ताव पुढे आल्याने विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया मागील वर्षापासून ऑनलाइन सुरू झाली; मात्र अजूनही त्यातील गोंधळ दूर झालेला नाही. २0१७-१८ च्या विधी अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी २0 आणि २१ मे १७ रोजी ऑनलाइन परीक्षा घेतली गेली. १ जून १७ रोजी निकालही जाहीर झाला; मात्र मुंबई विद्यापीठाचा निकाल न लागल्याने संपूर्ण विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया रखडली होती. दरम्यान, मुंबई विद्यापीठाचा निकाल लागल्याने हा तिढा सुटला. त्यामुळे पहिली विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाली. विद्यार्थ्यांना आता ९ ऑक्टोबरपासून कॉलेजमधून यासंदर्भात माहिती मिळणार आहे. पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना १३ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेता येईल. दरम्यान, प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
त्यामुळे प्रत्यक्षात विधी महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमाला नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. आता राज्यातील ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली होती, त्यातील अनेकजण इतर अभ्यासक्रमाकडे वळले आहेत. तब्बल सहा महिन्यांचा कालावधी या प्रक्रियेसाठी लागल्याने आता विधी महाविद्यालयात किती विद्यार्थी प्रवेश घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.