धरण क्षेत्रातील कृषी पंपांच्या जोडण्या काढण्यास सुरुवात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 01:32 AM2017-09-15T01:32:36+5:302017-09-15T01:35:22+5:30
पावसाने यावर्षी जिल्हय़ाकडे पाठ फिरविल्याने धरणात अल्प जलसाठा शिल्लक आहे. अकोला शहराची तहान भागविणार्या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात आजमितीस १७.३१ टक्के जलसाठा शिल्लक असून, हे पाणी केवळ पिण्यासाठीच आरक्षित ठेवले जाणार आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील कृषी पंपाच्या जोडण्या काढण्यात येत आहेत. एक तर पाऊस नाही, शेतकरी धरणाच्या पाण्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न करीत असताना कृषी पंपच बंद केल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
राजरत्न सिरसाट।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पावसाने यावर्षी जिल्हय़ाकडे पाठ फिरविल्याने धरणात अल्प जलसाठा शिल्लक आहे. अकोला शहराची तहान भागविणार्या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात आजमितीस १७.३१ टक्के जलसाठा शिल्लक असून, हे पाणी केवळ पिण्यासाठीच आरक्षित ठेवले जाणार आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील कृषी पंपाच्या जोडण्या काढण्यात येत आहेत. एक तर पाऊस नाही, शेतकरी धरणाच्या पाण्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न करीत असताना कृषी पंपच बंद केल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
आजमितीस ११.४४ दलघमी उपयुक्त जिवंत जलसाठा शिल्लक आहे, तसेच वाढते तापमान, बाष्पीभवन, जीर्ण जलवाहिन्यांमुळे पाण्याची नासाडी होत आहे, त्यामुळे पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच प्रशासनाने काटेपूर्णा धरणासह इतर धरण क्षेत्रातील कृषी पंपाच्या जोडण्या काढण्याचा निर्णय घेतला असून, काटेपूर्णा धरण क्षेत्रातील जोडण्या काढण्यात सुरुवात केली आहे. जिल्हय़ातील धरणात जेमतेम जलसाठा शिल्लक असून, काटेपूर्णा धरणात आजमितीस १७.३१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यामध्ये ६.७५ दलघमी एवढा गाळ आहे. म्हणजे धरणात काटेपूर्णा प्रकल्पातून अकोला शहर, औद्योगिक वसाहत, मूर्तिजापूर शहर, साठ खेडी पाणीपुरवठा योजनेला पाणी सोडले होते; परंतु पाणी नसल्याने मूर्तिजापूर शहर व साठ खेड्यांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून, औद्योगिक वसाहतीला केवळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.
काटेपूर्णा प्रकल्पासह जिल्ह्यातील इतर प्रकल्पांची अवस्था वाईट आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा या मध्यम प्रकल्पात आजमितीस केवळ 0.४४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पातूर तालुक्यातील मोर्णा धरणात १७.५३ टक्के, तर निर्गुणा प्रकल्पात ३८.0९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. जिल्हय़ातील सर्वच मोठे, मध्यम तथा लघू प्रकल्पाची स्थिती बघितल्यास केवळ २९.0५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.
धरणात ६.७५ दलघमी गाळ!
जिल्हय़ातील धरणात जेमतेम जलसाठा शिल्लक असून, काटेपूर्णा धरणात आजमितीस १७.३१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यामध्ये ६.७५ दलघमी एवढा गाळ आहे. नाशिक येथील मध्यवर्ती संकल्पचित्र संस्थेने रिमोट सेन्सिंगद्वारे काटेपूर्णा धरणातील गाळाचे सर्वेक्षण केले असून, ६.७५ दलघमी गाळ असल्याचा या संस्थेच्या अहवालात नमूद आहे.
वान धरणाचे पाण्याचे लवकरच आरक्षण
यावर्षीची धरणातील जलसाठय़ाची स्थिती बघता जिल्हय़ातील धरणातील पाणी पिण्यासाठीच आरक्षित ठेवले जाणार आहे, तसेच शासनाची अमृत योजनेंतर्गत वान धरणातील पाणीदेखील आरक्षित ठेवले जाणार आहे.
शेतकर्यांवर संकट
प्रथम प्राध्यान्य पिण्याच्या पाण्यासाठी असल्याने या परिस्थितीत धरणातील पाणी पिकांना देता येणार नाही. त्यामुळेच धरण क्षेत्रातील कृषी पंपाच्या जोडण्या काढण्यात येत आहेत. याचा फटका शेती क्षेत्राला बसणार आहे.
जिल्हय़ातील जलसाठय़ाची स्थिती बघता धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच आरक्षित ठेवले जाणार आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. काटेपूर्णा धरण क्षेत्रातील पाणी इतर कारणासाठी देण्याचे बंद करण्यात येत आहे.
- जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, अकोला.