स्थलांतरित मुलांसाठी आनंदी वर्ग सुरू; वीटभट्टीच्या ठिकाणी सुरू झाली शाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 02:29 AM2018-02-08T02:29:08+5:302018-02-08T02:29:19+5:30
कुरूम : मूर्तिजापूर पं.स. अंतर्गत कुरुम येथील समूह साधन केंद्रात ६ फेब्रुवारीला वीटभट्टीवर काम करणार्या स्थलांतरित पालकांच्या मुलांच्या आनंदी वर्गाचे उद्घाटन मूर्तिजापूर पं.स.चे उपसभापती उमेश मडगे यांच्या हस्ते पार पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूम : मूर्तिजापूर पं.स. अंतर्गत कुरुम येथील समूह साधन केंद्रात ६ फेब्रुवारीला वीटभट्टीवर काम करणार्या स्थलांतरित पालकांच्या मुलांच्या आनंदी वर्गाचे उद्घाटन मूर्तिजापूर पं.स.चे उपसभापती उमेश मडगे यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डीआयसीपीईडीचे माजी प्राचार्य तथा ज्येष्ठ अधिव्याख्याता सोनारे, गटशिक्षणाधिकारी श्याम राऊत, कुरुम केंद्रप्रमुख प्रवीण रोकडे उपस्थित होते. जानेवारी २0१८ मध्ये तालुका स्तरावर शाळाबाह्य, स्थलांतरित मुलांचे सर्वेक्षण करण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी श्याम राऊत यांनी केले होते. त्या अनुषंगाने कुरुम केंद्रांतर्गत परिसरात सर्वेक्षण केले असता मधापुरी फाटा येथील अंकुश खोपे यांच्या वीटभट्टीवर ६ ते १४ वयोगटातील सात विद्यार्थी असल्याचे आढळले. या विद्यार्थ्यांना लगेच जि.प. मुलांची शाळा कुरुम , जि.प. कन्या शाळा कुरुम, जि.प. शाळा मधापुरी येथे दाखल करण्यात आले. परंतु वीटभट्टीपासून तीनही शाळा दोन कि.मी. अंतरावर असल्याने हे विद्यार्थी नियमित शाळेत उपस्थित राहत नव्हते.
परिणामी सर्व विद्यार्थी शाळाबाह्य राहणार होते. ही बाब लक्षात घेऊन वीटभट्टी मालक अंकुश खोपे यांच्याशी संपर्क करून हंगामी वर्ग सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली व एक खोली उपलब्ध करून घेतली. या वर्गाकरिता एका स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली. त्याचे मानधन लोकवर्गणीतून करण्याचे ठरविले.
विद्यार्थ्यांना गणवेश व पाठय़पुस्तके केंद्रांतर्गत शाळेमधून व काही शिक्षक सहकार्यांच्या मदतीने पुरविणे शक्य झाले. अशा या आनंदी वर्गाचे ६ फेब्रुवारीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रीतसर उद्घाटन करण्यात आले.
या कार्यात वीटभट्टी मालक अंकुश खोपे, जि.प. कन्या शाळा कुरुम येथील सहायक अध्यापक अजय मसनकर, जि.प. कन्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश गावंडे, बालरक्षक मो. ई. अली, मूर्तिजापूर गट साधन केंद्राचे विशेष शिक्षक रणजित सुरवाडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
या वर्गाकरिता गटशिक्षणाधिकारी श्याम राऊत यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
चिखलदरा, मध्य प्रदेशेतील मुले आढळली शाळाबाह्य
सर्वेक्षणात आढळलेल्या सात शाळाबाह्य विद्यार्थ्यांमध्ये गौरी गणेश कासदेकर वर्ग ४ था, गजली गणेश कासदेकर वर्ग १ ला, सोनुकुमार सोमा कासदेकर वर्ग ५ वा, राजकुमार सोमा कासदेकर वर्ग ३ रा सर्व रा.जामली ता.चिखलदरा जि.अमरावती, श्याम लक्ष्मण जांबेकर वर्ग ७ वा रा. मोरगळ ता. अंजनगाव सुर्जी जि.अमरावती, सन्निलाल तेलाराम दरसंबा वर्ग ४ था रा. माकाताबा जि.छिंदवाडा मध्य प्रदेश यांचा समावेश आहे.