पालकमंत्र्यांच्या घरापासून मालमत्ता मोजणीला सुरुवात
By admin | Published: June 2, 2015 02:11 AM2015-06-02T02:11:12+5:302015-06-02T02:11:12+5:30
महापालिकेची पूर्व झोनमध्ये मोहीम ; नगरसेवकांच्या घरांचेही मोजमाप.
अकोला: महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तेचे नव्याने करनिर्धारण करण्यासाठी मनपा प्रशासनाच्यावतीने मोहीम हाती घेण्यात आली असून, मोहिमेंतर्गत सोमवारी गृह व नगरविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या जठारपेठेतील घराचीही मोजणी करण्यात आली. मोजणीसाठी महापालिकेच्या विशेष पथकाला पाटील कुटुंबीयांना सहकार्य केले.
गत काही दिवसांपासून शहरामध्ये मालमत्ता मोजमापाचे काम सुरू आहे. सोमवारी मनपाच्या विशेष पथकाने उपायुक्त माधुरी मडावी यांच्या मार्गदर्शनात पूर्व झोनमध्ये मोजमाप करण्यास प्रारंभ केला. सर्वप्रथम जठारपेठेत राहणारे गृह व नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या निवासस्थानापासून मोहिमेची सुरुवात करण्यात आली. राज्यमंत्री डॉ. पाटील यांच्याकडे पथकाने जाऊन त्यांच्या निवासस्थानाचे मोजमाप केले. त्यानंतर विशेष पथकाने नगरसेवक विजय अग्रवाल, नगरसेवक गीतांजली शेगोकार, नगरसेवक बबलू जगताप यांच्याही घरांचे मोजमाप केले. त्यानंतर मनपा विशेष पथकाने पूर्व झोनमधील नागरिकांच्या घरांचे मोजमाप करण्याची मोहीम हाती घेतली.
आता जवळपास आठवडाभर पूर्व झोनमध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे. मोजमापाच्या वेळी पूर्व झोनचे क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, कनिष्ठ अभियंता नंदलाल मेश्राम, कर अधीक्षक विजय पारतवार, उस्मानभाई, सुरक्षा अधिकारी मुलसिंग चव्हाण, नंदकिशोर उजवणे उपस्थित होते