अकोल्यात बुधवारपासून राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन; डॉ. पंदेकृविची जय्यत तयारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 10:54 PM2017-12-24T22:54:03+5:302017-12-25T02:17:01+5:30
डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त २७ ते २९ डिसेंबरपर्यंत अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर तीन दिवसीय राज्यस्तरीय (अँग्रोटेक-२0१७) कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात नवे संशोधन, तंत्रज्ञानाची दालने शेतकर्यांना माहितीसाठी ठेवली जाणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोल्यात तीन दिवसीय राज्यस्तरीय (अँग्रोटेक-२0१७) कृषी प्रदर्शनाला बुधवारपासून सुरुवात होणार असून, राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे सकाळी १0 वाजता उद्घाटन होईल. यावेळी जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, अकोला जिल्हय़ातील सर्व आमदार, कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेच्या सदस्यांची प्रमुख उपस्थिती असेल.
डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त २७ ते २९ डिसेंबरपर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर हे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनात नवे संशोधन, तंत्रज्ञानाची दालने शेतकर्यांना माहितीसाठी ठेवली जाणार आहेत. हवामान बदल आणि त्याचा पावसावर होणारा परिणाम यानुषंगाने कृषी विद्यापीठाचे मॉडेल, पानलोट विकास, एकात्मिक कीड व्यवस्थापन, पशुपालनाचा पूरक व्यवसाय, कृषी माल प्रक्रिया उद्योगावर विशेष भर यावर्षी देण्यात आला असून, शेतकर्यांना यासंदर्भात अचूक माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी येथे तज्ज्ञ शेतकर्यांना मार्गदर्शन करतील, तसेच शेतकर्यांच्या शेतीसंबंधी उद्भवणार्या प्रश्नांचे निरसन करतील. महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष दालनाची येथे व्यवस्था करण्यात येणार आहे. २७ ते २९ डिसेंबरपर्यंत तीन दिवस चालणार्या कृषी प्रदर्शनाची कृषी विद्यापीठाने जय्यत तयारी केली आहे. यावर्षी भव्य तीन डोम उभारण्यात आले आहेत.