राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र पुन्हा अकोल्यातून बाहेर
By Admin | Published: November 7, 2014 12:47 AM2014-11-07T00:47:55+5:302014-11-07T00:47:55+5:30
१८ नोव्हेंबरपासून अमरावतीत प्राथमिक फेरी.
डॉ. किरण वाघमारे / अकोला
राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे अकोल्यातील केंद्र पुन्हा एकदा बंद झाले आहे. येत्या १८ नोव्हेंबरपासून अमरावती येथे प्राथमिक फेरीला सुरुवात होत आहे. अकोल्यातील नाट्यकलावंतांना आपसातील हेव्यादाव्यामुळे केंद्र टिकविण्यात अपयश आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दरवर्षी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा घेण्यात येते. मागील ५३ वर्षांपासून ही परंपरा अखंड सुरू आहे. यावर्षी ५४ वी राज्य नाट्य स्पर्धा होऊ घातली आहे. राज्यातील १९ केंद्रांवर ११ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत प्राथमिक फेरीसाठी स्पर्धा होणार आहेत. यामध्ये सर्वाधिक तीन केंद्र मुंबईत आहेत. मुंबईत गिरगाव येथील साहित्य संघ मंदिरात ११ ते २३ नोव्हेंबर आणि २७ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर, या कालावधीत नाट्य स्पर्धा होणार आहेत. मुंबईतीलच रवींद्र नाट्य मंदिरात १७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत नाट्य स्पर्धा होणार आहे. तर अमरावती येथे १८ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत स्पर्धा होणार आहेत.
मागील वर्षी अकोला हे केंद्र होते. यावर्षी नाट्यकलावंतांकडून प्रतिसाद नसल्यामुळे हे केंद्र बंद करण्यात आले आहे. अकोल्यात किमान ८ ते १0 संघ जर स्पर्धेत असते तर अकोल्याचे केंद्र अबाधित राहिले असते; परंतु यावर्षी केवळ तीनच नाट्यसंस्थांनी प्रवेशिका दाखल केल्या. त्यामुळे अकोल्याचे केंद्र बंद करून अकोल्याच्या संघांना अमरावती केंद्रात सामावून घेण्यात आले आहे.