वाळू साठ्यांची राज्य पर्यावरण समितीने केली विचारणा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 02:09 PM2019-01-25T14:09:19+5:302019-01-25T14:09:38+5:30
अकोला: राज्यात रखडलेली वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी नद्यांमधील वाळू घाटांत उपलब्ध वाळू साठा, वाळू घाटांचे नकाशे व घाटांच्या खोलीबाबत विचारणा करीत, यासंदर्भात संबंधित मुद्यांची माहिती २८ जानेवारीपर्यंत ‘आॅनलाइन’ सादर करण्याचे निर्देश राज्य पर्यावरण समितीमार्फत राज्यातील जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत
- संतोष येलकर
अकोला: राज्यात रखडलेली वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी नद्यांमधील वाळू घाटांत उपलब्ध वाळू साठा, वाळू घाटांचे नकाशे व घाटांच्या खोलीबाबत विचारणा करीत, यासंदर्भात संबंधित मुद्यांची माहिती २८ जानेवारीपर्यंत ‘आॅनलाइन’ सादर करण्याचे निर्देश राज्य पर्यावरण समितीमार्फत राज्यातील जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
राष्ट्रीय हरित लवादाच्या ११ डिसेंबर २०१८ रोजीच्या आदेशानुसार वाळू घाटांसंदर्भात पर्यावरण विभागाने गत १५ जानेवारी २०१६ रोजी काढलेली अधिसूचना निलंबित करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील जिल्हास्तरीय पर्यावरण समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यांत वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया रखडली आहे. त्यानुषंगाने वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील नद्यांमध्ये उपलब्ध वाळू साठा, वाळू साठ्याचे पुनर्भरण, वाळू घाटांचे नकाशे व वाळू घाटांची खोली यासंदर्भात विचारणा करीत, संबंधित मुद्यांची माहिती २८ जानेवारीपर्यंत आॅनलाइन सादर करण्याचे निर्देश राज्य पर्यावरण समितीने राज्यातील सर्व जिल्हा खनिकर्म अधिकाºयांना दिले. त्यानुसार वाळू घाटांसंदर्भात संबंधित मुद्यांची माहिती तयार करून राज्य पर्यावरण समितीकडे पाठविण्याची प्रक्रिया जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयांकडून सुरू करण्यात आली आहे.
‘या’ मुद्यांची मागितली माहिती!
- -वाळू घाटांचे सर्व्हे नंबर, गट नंबर व वाळू घाटांच्या भौगोलिक स्थानांचे अक्षांश-रेखांशासह वाळू घाटांची माहिती.
- -नदीतील पाणी वापराचे प्रमाण, वाळू घाटात पोहोचण्याचा मार्ग, पर्यावरण व्यवस्थापन व त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी.
- -नदीचे नाव, उपलब्ध वाळू साठा, वाळू साठ्याचे पुनर्भरण, नकाशे, वाळू साठ्याची खोली.
- -वाळू घाटांसंदर्भात आक्षेप असल्यास त्यासंदर्भात करण्यात आलेली कार्यवाही.
- -वाळू घाटांचा खाणकाम आराखडा व खाण बंद करण्याबाबतचा आराखडा.
- -प्रस्तावित वाळू उत्खननामुळे सभोवतालच्या पर्यावरणावर होणारे परिणाम.
राज्य पर्यावरण समिती आणि अपर मुख्य सचिवांनी दिलेल्या निर्देशानुसार वाळू घाटांसंदर्भात संबंधित मुद्यांची परिपूर्ण माहिती लवकरच आॅनलाइन राज्य पर्यावरण समितीकडे सादर करण्यात येणार आहे.
-डॉ. अतुल दोड,
जिल्हा खनिकर्म अधिकारी, अकोला.