स्थानिक पातळीवर अभद्र युतीचेच राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 02:15 PM2019-02-22T14:15:57+5:302019-02-22T14:16:03+5:30
अकोला: राजकारणात आणि प्रेमात सारे काही क्षम्य असते, असे म्हणतात. त्यामुळे कालपर्यंत एकमेकांना पाण्यात पाहणारे आज एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना दिसले तरी कुणालाही नवल वाटत नाही.
- राजेश शेगोकार
अकोला: राजकारणात आणि प्रेमात सारे काही क्षम्य असते, असे म्हणतात. त्यामुळे कालपर्यंत एकमेकांना पाण्यात पाहणारे आज एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना दिसले तरी कुणालाही नवल वाटत नाही. सध्या भाजपा, शिवसेना युतीची स्थिती अशीच आहे. केंद्रात भाजपाला ‘अच्छे दिन’ आल्याबरोबर राज्यात भाजपाने शिवसेनेला सावत्रपणाची वागणूक देणे सुरू केले. अखेर राज्यात सत्तेत सेनेचीच साथ घ्यावी लागली; संपूर्ण साडेचार वर्षाच्या कालावधीत या दोन पक्षातील संबंध ताणल्या गेले अन् आता भाजपाची हवा खराब झाल्यावर पुन्हा युतीसाठी शिवसेनेची मनधरणी होऊन एकत्रित घोषणा झाली. या पृष्ठभूमीवर पश्चिम वºहाडातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा आढावा घेतला असता पक्षीय मतभेद बाजूला ठेवत अनेक अभद्र युती,आघाडी सध्या गुण्यागोविंदाने नांदत आहेत. अशा अभद्र समीकरणाचा गुंता निवडणुकीच्या आधी संपणार आहे का? हा प्रश्नच आहे.
पश्चिम वºहाडातील बुलडाणा व अकोला या दोन जिल्हा परिषदांमध्ये सध्या एकमेकांच्या विरोधात तेल लावून मैदानात उतरण्याची तयारी करीत असलेले पक्ष एकत्रित नांदत आहेत. अकोला जिल्हा परिषदेत भारिप-बमसंची सत्ता आहे. या जिल्हा परिषेदवर भगवा फडकविण्याचा चंग गेल्यावेळी शिवसेनेने बांधला होता; मात्र ऐनवेळी हाराकिरी झाल्याने सेनेतच वादळ उठले अन् भारिपची सत्ता अबाधित राहिली. भारिपकडे २३ सदस्य संख्या होती. त्यामध्ये एका अपक्षासह राष्टÑवादीच्या सदस्याची भर पडून भारिपची सदस्य संख्या २५ झाली. सत्ता स्थापनेसाठी भारिपने राष्टÑवादी व काँग्रेसची साथ घेतली. राष्टÑवादीच्या एकमेव सदस्याला थेट अर्थ व शिक्षण सभापतीपद देऊन भारिपने आपली पकड मजबूत केली. एकमेव सदस्याच्या पाठिंब्याने का होईना; पण सध्या भारिप-राष्टÑवादी अशी सत्ता जिल्हा परिषदेत आहे. भारिपचे सर्वेसर्वा अॅड. बाळासाहेब आंबेडकर प्रत्येक सभेत राष्टÑवादीच्या शीर्षस्थ नेत्यांना ठोकून काढत असतानाही जिल्हा परिषदेतील राष्टÑवादीचा टेकू मजबूतच आहे.
बुलडाणा जिल्हा परिषदेत भाजपाला राष्टÑवादीचे पाठबळ मिळाले असून, येथे शिवसेना विरोधात आहे. विशेष म्हणजे भाजपाचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, सेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव, व राष्टÑवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे हे लोकसभा उमेदवारीचे प्रबळ दावेदार होते. भाजपा, सेना युती झाल्याने प्रतापराव जाधव यांना बळ मिळाले असले तरी सेनेला जिल्हा परिषदेच्या सत्तेबाहेर ठेवण्याचा भाजपाच डाव होता. त्याला राष्टÑवादीने लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी साथ दिली. बुलडाण्यात डॉ. राजेंद्र शिंगणे हेच राष्टÑवादी काँग्रेसचा एकमेव असे प्रबळ नेतृत्व आहे. ते आता लोकसभेच्या मैदानात शड्डू ठोकण्यासाठी तयारी करीत आहेत. या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषदेतील सत्तेचा वाटा सोडण्यासाठी भाजपा पुढाकार घेणार की राष्टÑवादी?
अकोला जिल्हा
तेल्हारा नगरपालिका-भाजपा/राष्टÑवादी काँग्रेस
पातूर नगरपालिका-काँग्रेस/भाजपा
मूर्तिजापूर नगरपालिका- भाजपा/राष्टÑवादी काँग्रेस
बाळापूर पंचायत समिती- भारिप/काँग्रेस
बार्शिटाकळी नगरपंचायत-काँग्रेस/भाजप
बार्शिटाकळी पंचायत समिती-भारिप-काँग्रेस
बुलडाणा जिल्ह्यातील पंचायत समिती
मोताळा :- काँग्रेस-शिवसेना युती
लोणार :- शिवसेना-राष्ट्रवादी
सिंदखेड राजा:- राष्ट्रवादी- भाजप
चखली :- काँग्रेस-सेना
बुलडाणा:- काँग्रेस-भारिप
वाशिम जिल्हा
मंगरुळपीर न.प.-भारिप-भाजप
मालेगाव नगर पंचायत- राष्ट्रवादी-शिवसेना
कारंजा पंचायत समिती -शिवसेना-काँग्रेस