राज्य माहिती आयोगाची सुनावणी-आदेश आता ‘निर्णय प्रणाली’वर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 12:10 PM2020-10-26T12:10:59+5:302020-10-26T12:13:24+5:30
State Information Commission सुनावणी व आदेश पारित करण्याची प्रक्रिया आता ‘निर्णय प्रणाली’ या स्वाॅफ्टवेअरवर करण्यात येणार आहे.
- संतोष येलकर
अकोला: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठात घेण्यात येणाऱ्या सुनावणी व आदेश पारित करण्याची प्रक्रिया आता ‘निर्णय प्रणाली’ या स्वाॅफ्टवेअरवर करण्यात येणार आहे. त्यामुळे माहिती अधिकारातील प्रकरणे निकाली काढण्याची प्रक्रिया गतिमान होणार आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीत प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून राज्य माहिती आयोगाचे मुख्य माहिती आयुक्त यांच्या निर्देशानुसार १५ जून २०२० पासून राज्य माहिती आयोगांतर्गत ऑनलाइन सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठात ऑनलाइन सुनावणी घेण्यात येत आहेत. त्यामध्ये माहिती अधिकारातील प्रकरणे वेळीच निकाली काढण्यासाठी राज्य माहिती आयोगाच्या अमरावती खंडपीठाने ‘निर्णय प्रणाली’ स्वाॅफ्टवेअर विकसित केले आहे. त्यानुसार राज्य माहिती आयोगाच्या अमरावती खंडपीठात होणाऱ्या सुनावणी व त्यानंतर आदेश पारित करण्याची कार्यवाही २६ ऑक्टोबरपासून ‘निर्णय प्रणाली’ या स्वाॅफ्टवेअरवर करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य माहिती आयोगाच्या अमरावती खंडपीठांतर्गत अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती व यवतमाळ इत्यादी पाच जिल्ह्यातील माहिती अधिकारातील प्रकरणे तातडीने निकाली काढण्याची प्रक्रिया गतिमान होणार आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर माहिती अधिकाराची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी राज्य माहिती आयोगाच्या अमरावती खंडपीठाने ‘निर्णय प्रणाली’ हे स्वाॅफ्टवेअर विकसित केले आहे. या प्रणालीवर सुनावणी घेण्याची व आदेश पारित करण्याची प्रक्रिया २६ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी खंडपीठांतर्गत पाचही जिल्ह्यातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची २४ ऑक्टोबर रोजी बैठक घेण्यात आली व त्यांना ‘निर्णय प्रणाली’ संदर्भात माहिती देण्यात आली.
- संभाजी सरकुंडे, माहिती आयुक्त, अमरावती खंडपीठ, राज्य माहिती आयोग.