राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा :अकोल्याच्या चार बॉक्सर अंतिम फेरीत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 11:08 AM2019-11-17T11:08:52+5:302019-11-17T11:09:27+5:30
विजयी बॉक्सरांना राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात स्थान मिळणार आहे.
अकोला: १९ व्या वरिष्ठ महिला महाराष्ट्र राज्यस्तरीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेतील उपांत्य फेरीतील लढती शनिवारी झाल्या. यामध्ये अकोला शहराच्या चार बॉक्सर अंतिम फेरीत दाखल झाल्या. ४८ किलो वजनगटात दिया बचे, ५१ किलो संगीता रुमाले, ६० किलो पूनम कैथवास, ८१ किलोच्यावर वजनगटात शायान पठाण हिने शानदार खेळप्रदर्शन करीत अंतिम लढतीसाठी पात्रता सिद्ध केली.
४८ किलो वजनगटात ठाण्याची नीलम यादव आणि अकोला शहरची दिया बचे यांच्यात लढत झाली. यामध्ये ०-५ गुणांनी दियाने विजय मिळविला. ५१ किलो वजनगटातील लढत मुंबई शहरची ज्योती धाडसे आणि अकोला शहरची संगीता रुमाले यांच्यात लढत झाली. यामध्ये संगीताने विजयी ठोसे मारले. ६० किलो वजनगटात अकोल्याची पूनम कैथवास आणि साताराची पूजा शिंदे यांच्यात लढत झाली. पूनमने पहिल्याच फेरीत आक्रमक शैली वापरू न पूजाला धूळ चारली. पूजाने खेळण्यास नकार दिल्यामुळे पंचांनी लढत थांबविली. पूनमला विजयी घोषित करण्यात आले. ८१ किलोच्यावर वजनगटातील लढत अकोल्याची शायान पठाण आणि पुणेची खानसा शेख यांच्यात झाली. दोघींनीही उत्तम खेळप्रदर्शन केले. यामध्ये अकोल्याच्या शायानने बाजी मारली.
उर्वरित लढतींमध्ये रेखा येलगुंडे पुणे, अंजली गुप्ता, तेजस्विनी जव्हेरी औरंगाबाद, ऐश्वर्या वाघ अहमदनगर, नेहा मराठे पालघर, लक्ष्मी मेहरा पुणे, प्रियंका गवळी कोल्हापूर, सिमरन मेनन मुंबई, वैष्णवी मांडेकर पुणे, अंजली मोरे नाशिक, मनीषा ओझा मुंबई, सानिका ससाने कोल्हापूर, ऋतुजा दिवेकर मुंबई यांनी विजय मिळविला. उद्या रविवारी अंतिम लढतीमध्ये कोण बाजी मारते, याकडे बॉक्सिंगप्रेमींचे लक्ष लागले आहे. विजयी बॉक्सरांना राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात स्थान मिळणार आहे.