अकोल्यात रविवारी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा
By Atul.jaiswal | Published: January 24, 2024 07:19 PM2024-01-24T19:19:30+5:302024-01-24T19:21:18+5:30
चित्रकलेत पारंगत असलेले परीक्षकाकडून चित्रकला स्पर्धेचे परीक्षण होणार आहे.
अकोला: शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने पी स्क्वेअर फाउंडेशनच्यावतीने अकोला येथे राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन रविवार, २८ जानेवारी रोजी येथील नेहरु पार्क येथे करण्यात आले असून, त्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती संस्थेचे पियुष सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ही स्पर्धा चार गटात होणार असून, यामध्ये पहिला गट पहिली ते चौथीपर्यंत, दुसरा गट वर्ग पाचवी ते सातवी पर्यंत, तिसरा गट वर्ग आठवी ते दहावीपर्यंत तर चवथा गट हा खुला असणार आहे. तिन्ही गटासाठी समान बक्षीस राहणार आहेत. पहिले बक्षीस सायकल, दुसरे बक्षीस स्टडी टेबल, तिसरे बक्षीस स्कूल बॅग आहे. खुल्या गटासाठी ब्रॅण्डेड वॉच हे बक्षीस राहील. आयोजकांकडून सर्व विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी कागद देण्यात येणार आहे. चित्रकलेत पारंगत असलेले परीक्षकाकडून चित्रकला स्पर्धेचे परीक्षण होणार आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रात यशस्वी झालेले मान्यवर आमंत्रित केले आहेत. या सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक कार्यात विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव म्हणून सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी गणमान्य व्यक्तींचा सत्कार ही स्केअर फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला सचिन मोहोकार, अभिषेक वानखडे, कृष्णा खोटरे, ऋषी ढाईत, गौरव वानखडे आदी उपस्थित होते.