राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा अकोल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 04:33 PM2019-09-22T16:33:33+5:302019-09-22T16:33:38+5:30
२४ ते २७ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील आठ विभागातील खेळाडू सहभागी होणार आहे.
अकोला: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या विद्यमाने राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन अकोल्यात केले आहे. २४ ते २७ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील आठ विभागातील खेळाडू सहभागी होणार आहे. १४, १७, १९ वर्षाआतील सुमारे २८८ खेळाडू स्पर्धेत खेळप्रदर्शन करणार आहेत. तर थेट राज्यस्तर चाचणीत १४६ खेळाडू आपले कौशल्य आजमावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.
स्पर्धेची सविस्तर माहिती देण्याकरिता शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
राज्यस्तर स्पर्धेत सहभागी खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था आयोजन समितीमार्फत करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र व प्रावीण्य प्राप्त खेळाडूंना स्मृतिचिन्ह व प्रावीण्य प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेला महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हा बॅडमिंटन आणि शटलर्स संघटनेच्या तांत्रिक सहकार्य लाभणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन २५ सप्टेंबर रोजी होणार आहे. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत नियुक्त केलेल्या निवड समिती सदस्यांचे नियंत्रणाखाली २६ सप्टेंबरपासून निवड चाचणीचे आयोजन केले आहे. २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन १४ वर्षाआतील स्पर्धा नोएडा (उत्तर प्रदेश), १७ वर्षाआतील गटाची स्पर्धा छिंदवाडा (मध्यप्रदेश), १९ वर्षाआतील गटातील स्पर्धा पुणे (महाराष्ट्र) येथे होणार आहे. पत्रकार परिषदेला जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, तालुका क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाणे, बॅडमिंटन प्रशिक्षक निषाद डिवरे, तुषार देशमुख यांची उपस्थिती होती.