राज्य लॉटरीची गुढीपाडवा सोडत प्रचाराविनाच!
By admin | Published: March 27, 2017 09:41 PM2017-03-27T21:41:25+5:302017-03-27T21:41:25+5:30
विक्रेत्यांची नाराजी; राज्यभरात अध्र्याच तिकिटांची झाली विक्री
अकोला, दि. २७- महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने काढण्यात येणार्या लॉटरीच्या विविध सोडतींचा प्रचार व प्रसार माध्यमांसह इतर मार्गाने केला जातो. त्याचा लाभ लॉटरीच्या तिकीट विक्रीसाठी होतो. यावर्षी मात्र गुढीपाडवा भव्यतम सोडतीचा प्रचार राज्य सरकारने केला नसल्याने त्याचा परिणाम तिकीट विक्रीवर झाल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वतीने दरवर्षी विविध सण-उत्सवाच्या निमित्ताने सोडत काढली जाते. दिवाळी, दसरा, नाताळ, नवीन वर्षासह गुढीपाडवा या सोडतीची तिकीट विक्री दरवर्षी चढत्या क्रमानेच राहिली आहे. या सर्व सोडतीचा प्रचार-प्रसार विविध प्रसारमाध्यमांमधून सतत केला जात असल्याने तिकिटाची विक्री वाढते. यावर्षी मात्र गुढीपाडवा भव्यतम सोडतीसाठी राज्य सरकारच्या वित्त विभागाने या सोडतीचा प्रचारच केला नाही. या सोडतीसाठी तब्बल चार लाख तिकिटे छापण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र सोमवार दुपारपर्यंत अवघ्या दोन लाख तिकिटांचीच विक्री झाली आहे. विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वीच तिकीट विक्रीचे मुंबई येथील मुख्य एजंट यांनी वित्त सचिवांना प्रचारासंदर्भात स्मरणपत्रही दिले होते; मात्र वित्त विभागाने त्यांची दखल न घेतल्याने तिकिटाची मोठय़ा प्रमाणात विक्री होऊ शकली नाही. याचा तोटा विक्रेत्यांसह राज्य सरकारलाही झाला आहे. या संदर्भात राज्य लॉटरी विक्रीचे एजंट मनीष खेतान यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की पश्चिम वर्हाडात गुढीपाडवा सोडत लोकप्रिय आहे. तब्बल एक कोटीच्या वर बक्षीस असल्याने अनेक ग्राहक नववर्षानिमित्त तिकिटांची खरेदी करतात. यावर्षी सदर सोडतीचा प्रचारच झाला नसल्याने तिकीट विक्रीला फटका बसला आहे. त्याचा थेट संबंध वित्त विभागाला होणार्या उत्पन्नावर होत असल्याने प्रचारासाठी आलेला फंड खर्च न करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी खेतान यांनी केली आहे. दरम्यान, लॉटरीचे आयुक्त पाटील यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.