१ सप्टेंबरपासून परिचारिकांचे राज्यव्यापी आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 10:13 AM2020-08-17T10:13:32+5:302020-08-17T10:13:47+5:30
राज्यभरातील परिचारिका काळ््या फिती लावून रुग्णसेवा देणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोनाने थैमान घातले असताना रात्रंदिवस कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या परिचारिकांनी प्रलंबित मागण्यासाठी १ सप्टेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. या अंतर्गत राज्यभरातील परिचारिका काळ््या फिती लावून रुग्णसेवा देणार आहेत. शिवाय, प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शनेदेखील देणार आहेत. या काळात मागण्या मान्य न झाल्यास ८ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने दिला आहे.
गत पाच महिन्यांपासून जीव धोक्यात घालून परिचारिका रुग्णसेवा देत आहेत. या काळात वैयक्तिक, कौटुंबिक काळजी बाजूला ठेवून ते कोरोनाविरुद्ध लढत आहेत. त्यासाठी परिचारिकांना फ्रंटलाइन कोरोना योद्धा म्हणूनही गौरविण्यात आले; मात्र त्यांच्या मागण्यांकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आंदोलनाचा पवित्र घेत १ सप्टेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांना प्रलंबित मागण्याचे निवेदनही देण्यात आले आहे; मात्र या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे १ सप्टेंबरपासून आंदोलन करणार आहेत. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी राज्यभरातील परिचारिका काळ््या फिती लावून काम करणार असून, प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शनेही देणार आहेत.
तर बेमुदत कामबंद
शासनाने ८ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न केल्यास महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे बेमुदत कामबंद आंदोलन करू, असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.