राज्याच्या ‘जीएसटी’ महसुलात १२० टक्क्यांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 02:18 PM2018-04-18T14:18:01+5:302018-04-18T14:21:34+5:30
अकोला : वस्तू आणि सेवे कराच्या यंदाच्या आर्थिक वर्षातील कर वसुलीत महाराष्ट्र राज्याने उद्दिष्टापेक्षाही जास्त म्हणजे १२० टक्के विक्रमी महसूल गोळा केला आहे.
- संजय खांडेकर
अकोला : वस्तू व सेवा कराच्या यंदाच्या आर्थिक वर्षातील कर वसुलीत महाराष्ट्र राज्याने उद्दिष्टापेक्षाही जास्त म्हणजे १२० टक्के विक्रमी महसूल गोळा केला आहे. जीएसटी अंमलबजावणीनंतर राज्याने घेतलेल्या या करवसुलीच्या आघाडीची दखल घेत महाराष्ट्राचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्येक विभागीय जीएसटी कार्यालयाच्या अधिकाऱ्यां पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. विक्रमी महसूल वसुलीच्या संदर्भात प्रथमच वित्तमंत्र्यांनी अशा स्वरूपाची दखल घेतली आहे हे विशेष !
१ जुलै २०१७ रोजीपासून देशभरात जीएसटी कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. केंद्राच्या उत्पादन शुल्क विभागाकडून आणि पूर्वीच्या विक्रीकर आताच्या जीएसटी कार्यालयांकडून ही वसुली केली गेली. मार्च २०१८ मध्ये राज्याच्या वस्तू व सेवा कर खात्याने ९२८३८.९७ कोटी अर्थ संकल्पीय अंदाज बांधला होता; मात्र वास्तविक महसूल वसुलीमध्ये राज्याच्या जीएसटी कार्यालयाने ११२१९९ कोटींचा महसूल वसूल केला. ही आकडेवारी घेतलेल्या वार्षिक उद्दिष्टांपेक्षा १२० टक्क्यांनी जास्त आहे. ही बाब महाराष्ट्र राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राज्याचे वस्तू व सेवा कर आयुक्त राजीव जलोटा यांना ३ एप्रिल रोजी प्रशस्तिपत्र पाठवून राज्यातील संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे. राज्याच्या वित्तमंत्र्यांकडून प्रथमच अशा कौतुकाची थाप पाठीवर पडल्याने राज्यातील जीएसटी अधिकाºयांना प्रोत्साहन मिळाले आहे.सध्या वित्तमंत्र्यांनी दिलेले प्रशस्तिपत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.