आमदारांची प्रतिष्ठा; इच्छुकांची ‘सेमी फायनल’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:18 PM2019-03-30T23:18:30+5:302019-03-31T12:12:45+5:30
लोकसभा निवडणूक ही उमेदवारांसह विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांसाठी सेमी फायनल ठरणार आहे, तर विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांसाठी आपल्या पक्षाची प्रतिष्ठा कायम ठेवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
- राजेश शेगोकार
अकोला: पाच राज्यांतील निवडणूक निकालांनी काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसच्या महत्त्वाकांक्षेला पुन्हा सत्तेचे घुमारे फुटले होते, तर भाजपा-शिवसेना सावध झाली होती. संपूर्ण राज्यासह देशभरात विरोधक तगडे आव्हान उभे करतील, असे चित्र असताना लोकसभा निवडणुकीच्या जागा व उमेदवारी वाटपावरून काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस खिळखिळी झाली, तर दुसरीकडे झाले गेले विसरून भाजपा-सेनेने युती केली असली तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांना विधानसभेचे वेध असल्याने युती मनापासून एकत्र नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी आहे. या पृष्ठभूमीवर लोकसभा निवडणूक ही उमेदवारांसह विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांसाठी सेमी फायनल ठरणार आहे, तर विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांसाठी आपल्या पक्षाची प्रतिष्ठा कायम ठेवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना, काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढले होते. यामध्ये अकोला लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांत भाजपाचे चार, काँगे्रस व भारिप-बमसं प्रत्येकी एक असा विजय मिळाला आहे. अकोला जिल्ह्याचा विचार केला, तर पाचपैकी चार मतदारसंघ भाजपाकडे असून, भारिपकडे असलेल्या बाळापूर मतदारसंघात अवघ्या सहा हजार मतांनी भाजपाचा पराभव झाला आहे. या निवडणुकीनंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाने मारलेली मुसंडी इतर पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई ठरली आहे. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही कात्रजचा घाट दाखवित भाजपाने जिल्हा परिषदेचा अपवाद वगळता जवळपास सर्वच सत्ताकेंद्रांवर ताबा मिळविला आहे. आता युती अन् आघाडी एकत्रितपणे लोकसभा निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या निवडणुकीमध्ये असलेले उमेदवार याही निवडणुकीत कायम आहेत, त्यामुळे आपापल्या पक्षाच्या या उमेदवारांना २०१४ मध्ये मिळालेली मते कायम ठेवत आघाडी देऊन प्रतिष्ठा कायम ठेवण्याचे आव्हान विद्यमान आमदारांवर आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या नेत्यांनाही आपल्या पक्षाचे मतदान वाढवून विधानसभेची तयारी करण्याची संधी आहे.
बाळापूरचे आमदार बुलडाण्यात
अकोल्यातील बाळापूर मतदारसंघाचे आमदार व वंचित बहुजन आघाडीचे नेते बळीराम सिरस्कार हे बुलडाण्यात उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात वंचितच्या प्रचाराची आघाडी स्थानिक नेत्यांकडे सोपविली आहे. ते बुलडाण्यात असले तरी गेल्या साडेचार वर्षांत त्यांनी केलेल्या कामाची पावती अॅड. आंबेडकर यांना या मतदारसंघातील मतदार किती देतात, यावर सिरस्कारांची प्रतिष्ठा अवलंबून आहे.
लोकसभेचा इम्पॅक्ट विधानसभेवर
लोकसभा निवडणूक निकालाचा परिणाम हा विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवर निश्चीतच होणार आहे. प्रत्येक निवडणुकीत पक्ष आणि उमेदवार याबाबत मतदारांचे स्वतंत्र मत असले तरी या निवडणुकीच्या निमित्ताने इच्छुकांना आपल्या मतदारांसोबत संपर्क करीत प्रचाराचा एक राऊंड पूर्ण करण्याची संधी आहे. पक्षाचे मतदान कायम राहील, ते दुसरीकडे वळणार नाही, याकडे इच्छुकांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.