अकोला: चतारीच्या सरपंच, उपसरपंच अपात्रतेला ग्रामविकास मंत्र्यांची स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 06:29 PM2022-09-04T18:29:11+5:302022-09-04T18:29:23+5:30
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र: तीन लाख ५९ हजाराची अनियमिततेचा आरोप
अकोला: पातुर तालुक्यातील चतारी येथील सरपंच नवीता विनोद सदार, उपसरपंच सोनू मंगेश लखाडे यांनी लाखो रुपयांच्या निधीमध्ये अनियमितता केल्याच्या आरोपावरून अमरावतीच्या विभागीय आयुक्तांनी सरपंच, उपसरपंच यांना अपात्र तर सेवानिवृत्त सचिव आर. के. बोचरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश १९ मे रोजी दिले होते. परंतु सरपंच, उपसरपंच यांनी विभागीय आयुक्तांच्या आदेशाला आव्हान देत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम ३९ (३) नुसार ग्रामविकास मंत्री यांच्या न्यायालयामध्ये अपील दाखल केली होती.
या अपिलावर शासनाने अमरावतीच्या विभागीय आयुक्तांच्या आदेशाला स्थगिती दिली. याबाबतचे पत्र अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात आले आहे. चतारी ग्राम पंचायतच्या विविध विकास कामांमध्ये तीन लाख ५९ हजार १५० रुपयांचे शासनाच्या निधीमध्ये अनियमितता केल्याचे निष्पन्न झाल्याचे विभागीय आयुक्तांच्या मंजूर केलेल्या आदेशात नमूद होते. त्यामुळे सरपंच, उपसरपंच यांना अपात्र केल्याची कारवाई आयुक्तांनी केली होती. आता आयुक्तांच्या आदेशाला शासनाने स्थगती दिल्याचे आदेश १ सप्टेंबर रोजी पारित केले आहे.
सरपंच पदासाठी दोन्ही गटाकडून शर्तीचे प्रयत्न
निवडणूक झाल्यापासूनच सरपंच पदासाठी दोन्ही गटाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. सुरुवातीला सरपंच राखीवसाठी वाद, नंतर निधीमध्ये अनियमितता, प्रशासकाची नियुक्ती, अपात्र, नंतर अविरोध निवड, शेवटी थेट शासनाच्या न्यायालयात, यावरून असे स्पष्ट होते की, सरपंच-उपसरपंच पदासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे.