सराफा व्यावसायिकासह चोरटे जेरबंद
By Admin | Published: March 19, 2015 01:41 AM2015-03-19T01:41:14+5:302015-03-19T01:41:14+5:30
चौघांनाही २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी.
अकोला - बाश्रीटाकळी येथील सराफा व्यावसायी तळोकार याला मारहाण करून त्याच्याकडील सुमारे ४00 ग्रॅम सोने लुटणार्या तीन चोरट्यांसह त्यांच्याकडील सोने खरेदी करणार्या अकोला येथील सराफा व्यावसायिकास जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या चारही जणांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चारही आरोपींना २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कुरिअरद्वारे अकोल्यात आलेले सोने घेऊन जात असलेल्या इसमास मारहाण करून सुमारे अडीच किलो सोने लुटल्याची घटना ३ मार्च रोजी घडली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असून, या प्रकरणातच पोलिसांच्या एका विशेष पथकाने मंगळवारी रात्री माळीपुरा आणि दगडी पूल परिसरातील रहिवासी रोहित तिवारी, राकेश शर्मा व शिवा घोडेराव या तिघांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. यामध्ये या तीनही चोरटयांनी १३ मार्च २0१५ रोजी बाश्रीटाकळी येथील सराफा व्यावसायी तळोकार याच्याकडील सुमारे ४00 ग्रॅम सोने लुटल्याची माहिती दिली. यासोबतच सदर सोने हे अकोल्यातील सराफा व्यावसायी रितेश नांदूरकर याला विक्री केल्याचेही पोलिसांसमोर कबूल केले. या तीन चोरट्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रितेश नांदूरकर याला अटक केली असून, त्यानेही हे सोने आणखी एका सराफा व्यावसायिकास विक्री केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या तीन चोरट्यांसोबतच रितेश नांदूरकर याला पोलिसांनी अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले. या चोरट्यांसह सराफा व्यावसायी नांदूरकर याच्याकडून चोरीतील सोने खरेदीबाबत विचारपूस करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली असता न्यायालयाने चारही आरोपींना २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.