स्टरलाइट कंपनीच्या केबलची मनपाकडून तपासणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 03:57 PM2019-12-28T15:57:47+5:302019-12-28T15:58:03+5:30

अकोला : शहरात स्टरलाइट टेक कंपनीसह रिलायन्स जिओ कंपनीने नेमके किती अंतराचे खोदकाम करून केबलचे जाळे अंथरले, ही बाब ...

Sterlite Company's cable inspection begins | स्टरलाइट कंपनीच्या केबलची मनपाकडून तपासणी सुरू

स्टरलाइट कंपनीच्या केबलची मनपाकडून तपासणी सुरू

Next

अकोला : शहरात स्टरलाइट टेक कंपनीसह रिलायन्स जिओ कंपनीने नेमके किती अंतराचे खोदकाम करून केबलचे जाळे अंथरले, ही बाब तपासण्यासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने शुक्रवारी प्रत्यक्षात खोदकामाने सुरुवात करण्यात आली. स्टरलाइट कंपनीचे जाळे तपासण्यासाठी बांधकाम विभागाने खरप परिसरात खोदकामाला सुरुवात केली. सायंकाळी उशिरापर्यंत गीता नगर ते अकोली रोडलगतच्या केबलचे जाळे तपासण्याचे काम सुरू होते.
शहराच्या विविध भागात दिवसाढवळ्या मुख्य रस्त्यांलगतचा भाग खोदून फोर-जी केबल टाकल्या जात असल्याचा प्रकार लोकमतने चव्हाट्यावर आणल्यानंतर कुंभकर्णी झोपेत असलेल्या महापालिका प्रशासनाला जाग आली. मनपाच्या पूर्वपरवानगी शिवाय शहरात केबलचे जाळे टाकणाऱ्या मोबाइल कंपन्यांनी प्रशासनाचा सुमारे ३२ कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल बुडविल्याची माहिती आहे. या गंभीर प्रकरणाचा ऊहापोह झाल्यानंतरही मनपा प्रशासन चौकशी करीत नसल्याचे लक्षात येताच आमदार रणधीर सावरकर यांनी फोर-जी केबलचा घोळ तपासण्याचे निर्देश दिले. त्यावर मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या आदेशानुसार २४ डिसेंबर रोजी बांधकाम विभाग, अतिक्रमण विभागाने अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावरील रस्त्यालगतचा भाग खोदला असता, स्टरलाइट टेक कंपनीचे दोन पाइप आणि रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीचे तब्बल चार पाइप आढळून आले. याप्रकरणी रिलायन्स कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापकांविरोधात २३ व २४ डिसेंबर रोजी सिटी कोतवाली पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली. २६ डिसेंबर रोजी मनपा आयुक्तांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत दोन्ही कंपनीच्या व्यवस्थापकांनी समाधानकारक खुलासा न केल्यामुळे आयुक्त कापडणीस यांनी दोन्ही कंपनीने शहरात नेमके किती अंतराचे केबल टाकले, याची प्रत्यक्षात खोदकाम करून तपासणी करण्याचा आदेश जारी केला. त्यानुसार शुक्रवारी बांधकाम विभागातील उपअभियंत्यांनी स्टरलाइट टेक कंपनीच्या कामाची पाहणी केली.

कंपन्यांसोबत मनपाची मिलीभगत?
हद्दवाढीमुळे मनपा क्षेत्राचा तब्बल पाच पट भौगोलिक विस्तार झाला आहे. स्टरलाइट कंपनीला मनपाने ९ डिसेंबर रोजी केबल टाकण्याची परवानगी दिली असली तरी मागील दोन वर्षांपासून इतर मोबाइल कंपन्यांनी शहरात सर्वत्र फोर-जी केबल टाकण्याचा सपाटा लावला आहे. प्रामाणिकतेचा बुरखा घालून फिरणाºया बांधकाम विभागातील अधिकारी, अभियंत्यांची कंपन्यांसोबत मिलीभगत असल्याशिवाय शहरात खोदकाम करणे शक्यच नाही. शिवाय पारदर्शी कारभाराचा डंका वाजवणाºया सत्ताधारी भाजपच्या संमतीशिवाय कंपन्या धाडस करू शकत नाहीत, यावर शहरात खमंग चर्चा रंगली आहे.

शहरात १२ ठिकाणी केबलचे जाळे
शासनाच्या महानेट प्रकल्पासाठी मनपा क्षेत्रात २६ किलोमीटर अंतरासाठी सिंगल केबल टाकण्याचे काम स्टरलाइट टेक कंपनीला देण्यात आले आहे. मनपात ९ डिसेंबर रोजीच्या सर्वसाधारण सभेत स्टरलाइट कंपनीला परवानगी देण्यात आली. मनपाने परवानगी दिल्यापासून अवघ्या १३ दिवसांत कंपनीने शहरात १२ ठिकाणी खोदकाम करून केबल टाकल्याचे दिसून येत आहे. एवढ्या कमी कालावधीत केबल टाकणे शक्य आहे का, याची प्रशासनाने तपासणी करण्याची गरज आहे. शुक्रवारी बांधकाम विभागाने स्टरलाइटने टाकलेल्या चार ठिकाणी खोदकाम करून तपासणी केली.


रिलायन्सचे केबल आढळले; मनपाने मागितला खुलासा
गीता नगर ते अकोली रोडलगत स्टरलाइट कंपनीचे केबल तपासताना खोदकामादरम्यान मनपा प्रशासनाला रिलायन्स कंपनीचे चार पाइपद्वारे टाकलेले केबल आढळून आले आहे. यातही रिलायन्सच्या केबल खाली स्टरलाइट कंपनीचे केबल असल्याचे समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याप्रकरणी मनपाने रिलायन्स कंपनीला खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

Web Title: Sterlite Company's cable inspection begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.